मुंबई : महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील प्रमुख गॅस कंपन्यांनी शुक्रवारी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे.त्यामुळे सरत्या वर्षाच्या अखेरीस मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, हा दिलासा सर्वसामान्यांना नसून छोटे दुकानदार आणि हॉटेलमालकांना देण्यात आला आहे.
फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातच कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर ३९.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. साधारणत: गॅस सिलिंडरच्या दरात प्रत्येक महिन्याच्या पहिला तारखेला बदल केला जातो. कधी सिलिंडरचे दर वाढतात तर कधी कमी केले जातात. पण, यावेळी ख्रिसमस सणाच्या आधीच गॅसचे दर कमी करण्यात आले आहेत.
गॅस कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात ३९.५० रुपयांनी कपात केल्यानंतर आजपासून दिल्लीत व्यावसायिक गॅसचा सिलिंडर १७५७ रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी या सिलिंडरची किंमत १७९६.५० रुपये इतकी होती. कोलकात्यात १९ किलोच्या सिलेंडरची किंमत आता १ हजार ८६८. ५० इतकी झाली आहे आहे.
दुसरीकडे मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर आता १ हजार ७१० रुपयांना मिळणार आहे. तर, चेन्नईमध्ये १९ किलोचा एलपीजी सिलिंडर १ हजार ९२९ रुपयांना विकले जाणार आहे. दरम्यान, १ डिसेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली असली, तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ९०२.५ रुपये आहे. तर दिल्लीत घरगुती सिलिंडर ९०३ रुपये, पश्चिम बंगाल ९२९ रुपये, तर चेन्नईत घरगुती गॅस सिलिंडर ९१८.५ रुपयांना विकला जात आहे
