महापालिकेस जमीन हस्तांतरित झाल्यानंतर राजर्षी शाहू महाराज स्मारक आराखडा व निधी :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर:कोल्हापुरातील शाहू मिल येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासंदर्भात जमीन हस्तांतर, स्मारकाचा आराखडा आणि निधी हस्तांतर याबाबत सरकारनं कोणती कार्यवाही केली असा प्रश्न काँग्रेसचे विधान परिषदेतील गट नेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, सदरची जमीन महापालिकेस हस्तांतरित झाल्यानंतर स्मारकाचा आराखडा आणि आवश्यक निधी देण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

कोल्हापूर शहरातील शाहू मिल येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचं काम तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन मे-2023 मध्ये तत्कालीन पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र, हे आश्वासन देऊन सहा महिने उलटले तरी याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. याबाबत आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नउपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. राज्य वस्त्रोद्योग महामंडळाकडे असलेली शाहू मिलची जागा महानगरपालिकेस हस्तांतर करण्याबाबत, तसेच  स्मारकाचा आराखडा आणि निधी हस्तांतर करण्याबाबत सरकारने कोणती कार्यवाही केली असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. 

यावर उत्तर देताना, सदरची जमीन महापालिकेस हस्तांतरित करण्याच्या अनुषंगानं महापालिकेकडून वस्त्रोद्योग महामंडळाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पुण्यातील डिझाईन कन्सल्टंट आर्किटेक्ट प्रा. ली. यांनी तयार केलेल्या स्मारकाच्या आराखड्यास समितीने मंजुरी दिली आहे. शाहू मिलची जमीन महापालिकेस हस्तांतरित झाल्यानंतर स्मारकाचा आराखडा आणि त्यासाठी आवश्यक असलेला निधी याबाबत शासन स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.