थंडीत आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. हिवाळा सुरु झाला की हवामानातील बदलामुळे अनेक जण आजारी पडतात. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आहार देखील तितकाच महत्त्वाचा असतो.हिवाळ्यात आपली पचनशक्ती कमकुवत होते. ज्याचा रोगप्रतिकार शक्तीवर देखील प्रभाव पडतो. त्यामुळे हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात बदल केला पाहिजे.
बरेच लोकं गव्हाच्या पिठाच्या चपात्या खातात. पण हिवाळ्यात ज्वारीची भाकर खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. ज्वारीची भाकर खाल्ल्याने पचनक्रिया तर मजबूत राहते. तसेच अनेक आजारांपासून देखील लांब राहता. अनेक लोकं हिवाळ्यात बाजरी किंवा मक्याची भाकर देखील खातात. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात ज्वारीची भाकर खाण्याचे फायदे सांगणार आहोत.
अनेक आजारांपासून बचाव
ज्वारीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, व्हिटॅमिन-बी, कॉम्प्लेक्स असे महत्त्वाचे घटक आढळतात. जे शरीराला आजारांपासून लांब राहण्यासाठी मदत करतात.
हाडे मजबूत करते
ज्वारीची भाकरी खाल्ल्याने आपली हाडेही मजबूत होतात. ज्वारीमध्ये असलेले प्रोटीन स्नायू आणि हाडे मजबूत करतात. ज्वारी ही ग्लुटेन मुक्त आहे. त्यामुळे ग्लुटेन मुक्त अन्न खाणाऱ्यांसाठी देखील ती आरोग्यदायी ठरते.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते
हिवाळ्यात ज्वारीची भाकर आपल्या रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात ठेवते. डायबिटीजच्या रुग्णांनी हिवाळ्यात ज्वारीची भाकर खालली पाहिजे.
पचनशक्ती वाढवते
ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. जे पचनसंस्था मजबूत करते. त्यामुळे बद्धकोष्ठता सारख्या समस्येपासून देखील आराम मिळतो.
वजन नियंत्रित ठेवण्यास मदत
ज्वारीची भाकर खाल्ल्याने पोट भरलेले राहते. ज्यामुळे तुम्ही सारखे सारखे खाणे टाळता. यामुळेच वजन नियंत्रित राहण्यात मदत होते.
हृदयरोगापासून संरक्षण
ज्वारी ही हृदयविकारापासून देखील आपले संरक्षण करते. यामध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.