साळवण प्रतिनिधी ( एकनाथ शिंदे) येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम सन 2023-24 मध्ये गळीतास आलेल्या उसास प्रति मे. टन 3200 रूपयाप्रमाणे ऊस बिले शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत.
हंगाम सुरुवातीपासून ते 15 नोव्हेंबर 2023 अखेर कारखान्याकडे गळीतास आलेल्या 43 हजार 329 मे. टन ऊसाच्या बिलापोटी 13 कोटी 86 लाख 54 हजार एवढी रक्कम आजरोजी संबंधीत शेतक-यांच्या बँक खाती जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली.
आमदार पाटील पुढे म्हणाले, कारखान्याची एफ.आर.पी. प्रति मे. टन 3020 रूपये आहे. मात्र कारखाना संचालक मंडळाच्या धोरणानुसार चालू वर्षी गळीतास येणा-या ऊसास प्रतिटन 3200 रूपये एकरकमी देण्याचे ठरले आहे. त्यानुसार हंगाम सुरुवातीपासून ते 15 नोव्हेंबर दरम्यान गळीतास आलेल्या ऊसाची बिले संबंधित ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर आज जमा करण्यात आली आहेत. कारखान्याने चालू गळीत हंगामात 13 डिसेंबर अखेर 1 लाख 71 हजार 350 मे. टन ऊसाचे गाळप करुन 1 लाख 63 हजार 500 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केलेले आहे.
चालू वर्षी 5.50 लाख मे. टन गाळपाचे उददिष्ट आहे. गळीत हंगाम सन 2023-24 साठी शेतक-यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस गळीतास पाठवून कारखान्याने ठरविलेले गाळप उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालक जयदिप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील उपस्थित होते