उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर जरांगे यांची प्रतिक्रिया आली समोर…

मुंबई: जालन्‍यातील आंतरवाली सराटी गावात 1 सप्टेंबरला मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यात आला होता. या प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील लेखी उत्तर सभागृहात सादर केले आहे. तसेच, निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची आणि केलेल्या कारवाईची माहिती दिली.

यावेळी विधानसभेत या प्रकरणाचे लेखी उत्तर सादर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या घटनेमध्ये जवळपास 50 आंदोलक जखमी झाले असून 79 पोलीस जखमी आहेत. त्यामुळे या घटनेत सर्वाधिक पोलीस जखमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी बचावात्मक आणि वाजवी पद्धतीने बळाचा वापर केला.

ज्यामुळे कोणत्याही पद्धतीने गुन्हे सरसकट मागे घेण्यास नकार दिल्याचे या लेखी उत्तराच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. तर, सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल, असे या लेखी निवेदनातून सांगण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आंतरवालीतील मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यास या लेखी उत्तराच्या माध्यमातून असमर्थता दर्शविली आहे.

दरम्यान, आता देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर जरांगे पाटील  यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गुन्हे मागे घेतले नाही तर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा उघडे पाडू, असा इशारा त्यांनी दिला. तसेच 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाले, तर तिथून पुढे सरकारला पश्चाताप करावा लागेल, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. यावेळी जरांगे माध्यमांशी संवाद साधत होते.

जरांगे पाटील म्हणाले, “सरकार आरक्षणाचा विषय किती गांभीर्याने घेत आहे, हे माहीत नाही. पण 24 डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षण मिळणार हे शंभर टक्के सांगतो. आमच्या मुलांचे भवितव्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही मोठे केलेले नेते जर आमच्याविरोधात जायला लागले, तर त्यांना पायाखाली तुडवायला आम्हाला वेळ नाही लागणार.

महाराष्ट्रातला मराठा काय आहे? हे त्यांना लक्षात येईल. सरकार हा विषय प्रामुख्याने का घेत नाही, याच्यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. गुन्हे मागे घेण्याबाबत आम्हाला काय आश्वासन दिले, आरक्षणासाठी काय आश्वासन दिले, यावर आमचे लक्ष आहे’. अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.