मुंबई : यापूर्वी ओबीसी नेते जरांगेंवर टीका करायचे पण आता मराठा नेतेच त्यांच्यावर टीका करत आहेत. कारण नारायण राणे यांनी जरांगे यांच्यावर काल पत्रकार परिषदेत बोलताना सडकून टीका केली होती.”जरांगे कोण मी ओळखत नाही,” असं त्यांनी म्हटलं होतं. आता त्यांच्या या विधानावर खुद्द मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी भाष्य केलं आहे.
नारायण राणेंवर भाष्य
पश्चिम महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी सभा घेतल्यानंतर आता जरांगे हे मराठवाडा, विदर्भ, खान्देश असा चौथ्या टप्प्यातल्या दौऱ्यावर आहेत. यावेळी संभाजीनगर इथं राणेंवर बोलताना जरांगे म्हणाले, “जाऊ द्या आम्हाला काही फरक पडत नाही.
सरकारनं आमचं लक्ष्य विचलित करण्यासाठी आमचेच लोक आमच्या अंगावर घालवण्याचं ठरवलेलं आहे वाटतं. आम्ही आता त्यांच्याकडं लक्ष द्यायचं कमी केलं आहे. कदाचित त्यांची मजबुरी असेल. सरकार त्याना जाणून बुझून बोलायला लावत असेल म्हणून ते बोलत असतील”
पावसामुळं सभास्थळी चिखल
या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतात असलेल्या सभास्थळी सर्वत्र चिखल झाला आहे. यापर्श्वभूमीवर सभेबाबत जरांगे म्हणाले की, “गुडघ्यापर्यंत चिखल झाला तरी मराठे थांबणार नाहीत.
कारण आम्ही ७० वर्षांपासून आरक्षणापासून वंचित आहोत आणि आता ते मिळायला लागलं आहे. त्यामुळं मुसळधार पाऊस, कडक ऊन असलं तरी मराठे येणार. आपल्या लेकरांचं भविष्य उद्ध्वस्त नाही झालं पाहिजे यासाठी घराघऱातला मराठा येणार. आता पाऊस येणार ऊनही पडणार हे दोन्ही आम्हाला सहन करायची सवय आहे. कारण आम्ही शेतकरी मराठा आहोत”
भुजबळ विरुद्ध जरांगे यांच्यातील संघर्षावरच सोशल मीडियावर चर्चा आहे. यावर जरांगे म्हणाले, “मूळ मुद्दा मागं राहत नाही. सोशल मीडियावर त्यांचेच दोन-चार लोक आहेत. कार्यक्रमात मी आरक्षणाशिवाय वेगळ्या मुद्यांवर जास्त बोललेलो नाही. पण हे मध्येच आलेत आणि बरळतात त्यांना जरा नीट करावं लागतं नाहीतर त्यांना टायफॉईड होईल ना”