कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असलेल्या उचगाव मध्ये सतेज पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे. विजय गुळवे, विनायक जाधव, मच्छिंद्र सुतार आणि संभाजी पाटील यांनी आपल्या समर्थकांसह सतेज पाटील गटाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.
नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत या चौघांनी पक्षप्रवेश केला. चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांनी राजकीय गट तट विचारात न घेता नेहमीच विकासाला साथ दिली आहे. म्हणूनच हा निर्णय घेतल्याचे यावेळी विजय गुळवे यांनी सांगितले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास केवळ भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच होऊ शकतो हे लक्षात आल्यामुळे अधिकाधिक कार्यकर्ते आमच्या सोबत येत आहेत असे प्रतिपादन नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
सुडाचे राजकारण न करता सर्वसामान्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा भारतीय जनता पक्षाचा विचार लोकांना पटत आहे अशा भावना खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केल्या. तर माजी आमदार अमल महाडिक यांनी सर्वांना न्याय देण्याची आमची भूमिका असल्यामुळे लोकांची साथ लाभत आहे, भविष्यात इतर गावांमधून अन्य काही प्रवेशही पार पडणार असल्याचा गौप्यस्फोट केला.
यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, राजाराम कारखान्याचे संचालक तानाजी पाटील, अनिल पंढरे, किरण घाटगे, अनिल शिंदे, एन डी वाईंगडे, राजू संकपाळ, उमेश पाटील, अभिजीत पाटील, दत्तात्रय तोरस्कर, राजेंद्र चौगुले, उमेश देशमुख, प्रवीण चव्हाण, सतीश मर्दाने, अनिल अवघडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. उचगाव सारख्या मोठ्या गावातील कार्यकर्त्यांनी सतेज पाटील गटातून भाजपमध्ये केलेला प्रवेश नव्या समीकरणांची नांदी ठरणार आहे.