कोल्हापूर: गेली कित्येक वर्षापासून ग्रामपंचायत रेंदाळ मध्ये नोकरशहा (ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी )यांचे हुकूमशाही पद्धतीने कामकाज सुरू आहे. कायदा व व्यवहार याची सांगड घालून कामकाज करणे या गोंडस नावाखाली ग्रामपंचायत रेंदाळमध्ये मनमानी कारभार सुरू आहे.

गावातील कित्येक तक्रार अर्ज प्रशासन दरबारी धुळ खात पडलेले आहेत. त्यावरती गटविकास अधिकारी पंचायत समिती हातकणंगले यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे ग्रामपंचायत रेंदाळ यांना पाठीशी घालण्याचा प्रकार त्यांच्याकडून दिसून येत आहे .
रेंदाळ गावांमध्ये खालील प्रमाणे विषयावरती अनेक तक्रार अर्ज वरिष्ठ जिल्हा परिषद कोल्हापूर प्रशासन दरबारी गेलेले आहेत. यातील दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी शरद राजाराम पाटील व इतर सामाजिक कार्यकर्ते रेंदाळ ग्रामस्थ यांचे करवी उप - मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना प्रत्यक्ष भेटून खालील आशयाचे पत्र देण्यात आले .
जवळपास चार ते पाच वर्षाच्या पाठपुराव्यानंतर संतोष पाटील साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर व अरुण जाधव ( साहेब ) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग ) कोल्हापूर यांनी ग्रामपंचायत रेंदाळचे सर्व तक्रार विषय कायमस्वरूपी निकालात निघावेत या उद्देशाने शुक्रवार दिनांक 24/11/2023 रोजी दुपारी 12.30 वाजता उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे दालनात रेंदाळ सबंधित विस्तार अधिकारी ( पंचायत समिती) / ग्रामपंचायत रेंदाळकडील तत्कालीन / सद्याचे सरपंच, सदस्य ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत रेंदाळ बाबत तक्रार असणारे सर्व तक्रारदार यांची मूळ कागदपत्रांसह सुनावणीस हजर राहणेबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती हातकणंगले यांना कळविण्यात आलेले आहे.
ग्रामपंचायत रेंदाळ बाबत तक्रार विषय
१)ग्रामपंचायत रेंदाळचा आस्थापना खर्च शासकीय नियमानुसार नाही रोजगार सेवक, आकृतीबंध कामगार याबाबत शाशंकता आहे
२)ग्रामपंचायत रेंदाळ पाणीपुरवठा विभाग याचा खर्च अवाढव्य दाखवून जमा खर्च ताळेबंद न सादर करता पाणीपट्टी वसुली करण्यात येत आहे
३)मागील कित्येक वर्षापासून दिव्यांग बांधव 5% रक्कम अखर्चित आहे.
४) मागील कित्येक वर्षापासून मागासवर्गीय 15%टक्के निधी अखर्चित आहे.
५) महिला व बालकल्याण निधी 10% निधी अखर्चित आहे
६) ग्रामपंचायत रेंदाळ कडून 15 वा वित्त आयोग खर्च करण्यात आला यामध्ये त्रुटी आहेत
७) ग्रामपंचायत मालकी/ सरकारी जागा यावरती ग्रामपंचायतचेे नियंत्रण नाही , ग्रामपंचायत मालकीचे जागेवरती बांधण्यात आलेले गाळे व इतर वास्तू याचे भाडे ग्रामपंचायत महसूल मध्ये जमा होत नाही
८) ग्रामपंचायत रेंदाळ हद्दीतील सर्व मिळकती शासकीय नियमानुसार नोंदीत करण्यात आलेल्या नाहीत व त्याचेवर कर देखील आकारला जात नाही त्यामुळे ग्रामपंचायतचा महसूल कमी जमा होत आहे
९)ग्रामपंचायतकडे देखभाल दुरुस्तीसाठी असलेले गायरान जमीन यावरती ग्रामपंचायतचे नियंत्रण नाही या ठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय व उत्खनन सुरू असुन सरकारी जागेत अतिक्रमण झालेले आहे
१०) माहिती अधिकार अर्ज व तक्रार अर्ज याची दखल घेतली जात नाही. सामान्य नागरिक यांचे मत विचारात घेतलेे जात नाही. मासिक मिटींगला बसणे बाबत अर्ज केला असता परवानगी नाकारली जाते व गाव सभेत नागरिकांचे अर्ज देखील स्वीकारले जात नाहीत त्याचे वाचन न होता बोगस गाव सभा होतात , प्रत्यक्ष झालेले गाव सभा व त्याचे प्रोसेडिंग यामध्ये खूपच तफावत आहे
आपण आपले वेळेनुसार
रेंदाळ येथे समक्ष भेट देऊन सर्व मुद्द्यांची शहानिशा करावी व याबाबत दोषी असणारे यांचे वरती कारवाई करण्यात यावी जेणेकरून ग्रामपंचायत रेंदाळ मधील मनमानी व हुकूमशाही कारभार बंद होईल व शासकीय नियमाप्रमाणे कामकाज चालू शकेल सदर अर्जाची दखल घेऊन योग्य ते कारवाईसाठी सादर या आशयाचा अर्ज दिलेला आहे .
यामध्ये रेंदाळ गावचा सर्वांगीण विकासासाठी प्रशासन दरबारी वारंवार पाठपुरावा करणारे गावातील राजकीय व सामाजीक संघटनेचे पदाधिकारी आहेत यामध्ये भाजप जिल्हा सरचिटणीस डॉक्टर सचिन मेथे, मनसे मराठी कामगार सेना जिल्हाध्यक्ष विकास पुजारी ,हातकणंगले तालुका कोळी महासंघ अध्यक्ष धनंजय कोळी, कॉम्रेड इंद्रजीत विभूते, आर.पी.आय.( आठवले गट) रेंदाळ शहराध्यक्ष भगवान कांबळे, प्रहार दिव्यांग संघटना रेंदाळ शहराध्यक्ष जमीर माणकापुरे, सामाजीक कार्यकर्त्या भाजपा महिला आघाडी पुष्पांजली दैव मॅडम , सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील, किरण वाळके , संजय खानविलकर,गुंडा पुजारी, युवराज पाटील ,वैभव इंगळे (पाटील), सामाजिक कार्यकर्ते व समस्त रेंदाळ ग्रामस्थ आहेत. सदर पाठपुराव्याची दखल घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीसो स्वतः रेंदाळ ग्रामपंचायत प्रशासनास भेट देण्याचे आश्वासित केले आहे.
तत्पूर्वी कार्यालय कडून घेण्यात सबंधित रेंदाळ ग्रामपंचायत प्रशासन व रेंदाळ ग्रामपंचायत विषयीचे सर्व तक्रारदार यांची सुनावणी घेऊन ग्रामपंचायत रेंदाळचा कारभार योग्य दिशेने चालावा याबाबत काय योग्य मार्ग काढतात याबाबत रेंदाळ ग्रामस्थ प्रतीक्षेत आहेत याचा योग्य निर्णय येणाऱ्या काळात लवकरच लागेल व रेंदाळ ग्रामपंचायत चे कामकाज शासकीय नियमानुसार सुरळीत चालेल ही अपेक्षा सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
