मळगे खुर्द येथील महेश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

म्हाकवे( प्रतिनिधी) .: मळगे खु: ता.कागल येथील धडाडीचे कार्यकर्ते, बलभीम सेवा संस्थेचे चेअरमन व उद्योगपती महेश पाटील यांनी आपल्या अनेक सहकारी कार्यकर्त्यांसह बिनशर्त भाजपत प्रवेश केला. पक्ष प्रवेश होताच, श्री.महेश पाटील यांनी आपल्या तमाम सहकार्यासह बिद्रीत श्री शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीस पाठिंबा दिला. भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी त्यांच्या धाडसी निर्णयाचे स्वागत केले.

यावेळी श्री घाटगे म्हणाले, बिद्रित सत्ताधारी आघाडीतून शाहू परिवर्तन आघाडीमध्ये मोठ्या संख्येने होत असलेले प्रवेश व आम्हास मिळत असलेला उत्स्फूर्त पाठिंबा ही बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिवर्तनाची नांदीच आहे. बिद्री मध्ये सहकारी संचालकांना विश्वासात घेतले गेले नाही. मंत्री हसन मुश्रीफ व चेअरमन के. पी. पाटील यांनी एकाधिकारशाहीने कारभार केला. याची प्रचिती उमेदवार निवडीतही आली आहे. त्यामुळे सत्ताधारी आघाडीत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. बिद्रीच्या लय भारी कारभाराची टिमकी केवळ हे दोन नेते व ठराविक कारभारी मंडळीच वाजवीत आहेत. सभासद व शेतकरी भिमुख कारभारासाठी शाहू परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा.

उद्योगपती महेश पाटील म्हणाले, सहकारातील आदर्श नेतृत्व असलेल्या स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आयुष्यात नंदनवन फुलवता येते हे कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे कार्यरत आहेत त्यांच्यासह इतर नेत्यांचे नेतृत्वाखालील शाहू परिवर्तन आघाडी सभासदांना न्याय देईल याची खात्री असल्यामुळे या आघाडीस पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी उमेदवार जयवंत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी राजे बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील, बिद्रीचे माजी संचालक दत्तामामा खराडे, पंचायत समितीचे माजी सदस्य भूषण पाटील, शाहूचे संचालक सुनील मगदूम, दिगंबर अस्वले, आर.बी.पाटील, एस. एम पाटील,सर्जेराव पाटीलआदी उपस्थित होते. स्वागत विवेकानंद पाटील यांनी केले प्रास्ताविक आप्पासो पाटील यांनी केले आभार भानुदास पाटील यांनी मानले..

ही तर घर वापसीच
महेश पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी पक्ष प्रवेश केलेला नसून ते त्यांच्या मूळच्या हक्काच्या घरात परत आले आहेत. ही त्यांची घरवापसीच आहे. घाटगे गटाच्या मूळ कार्यकर्त्यांनी आता कागल तालुक्यात पूर्वीचे वैभव परत मिळवण्यासाठी मागील चुका उगाळत न बसता तालुक्याच्या शाश्वत विकासासाठी एकत्र यावे. असे आवाहन ही श्री घाटगे यांनी केले.