20 रुपयांची साखर 15 रुपये करणाऱ्यांना सभासद धडा शिकवतील – आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी( प्रतिनिधी ) : कारखान्याचे खरे मालक म्हणून ऊस उत्पादक सभासदाकडे पाहिले जाते. परंतु याच शेतकऱ्यांना गेले अनेक वर्षे पीठीयुक साखर देण्याचे महापाप के.पी.पाटील यांनी केले आहे. आता निवडणूकीच्या तोंडावर हेच विद्यमान अध्यक्ष साखरेचा दर 20 रुपयेवरुन 15 रुपये कमी करण्याचे अश्वासन निवडणूकीच्या प्रचार शुभारंभावेळी करीत असून केवळ निवडणूकीच्या तोंडावर विविध आश्वासनांची वल्गना करणाऱ्या या नेत्यांना सभासद त्यांची योग्य जागा दाखवतील असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले ते गारगोटी येथे प्रमुख कार्यकर्ऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते.

बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, कारखाना हा सभासदांच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू आहे. स्वच्छ आणि पारदर्शक कारभारातून कारखान्यात विविध सभासदाभिमूख योजना राबविता येतात. परंतु के.पी.पाटील यांनी एकाधिकारशाहीचा वापर करीत केवळ स्वहित साधण्याचा प्रयत्न केला. कारखान्याच्या अनेक चुकीच्या बाबींवर लेखापरीक्षणातून ताशेरे ओढले आहे. या बाबींवर न बोलता केवळ लय भारीची टिमकी वाजविण्यामध्ये मशगुल झाले आहेत. परंतु यावेळी सुज्ञ सभासदांनी परिवर्तन करण्याचा निश्चय केला असून परिवर्तन अटळ आहे. तसेच चेअरमन के.पी.पाटील निवडणूकीच्या तोंडावर आश्वासने देत असून त्यांनी सत्ता असताना काय केले यांचे उत्तर द्यावे असे आवाहन देखील केले.

यावेळी बोलताना माजी संचालक दत्तात्रय उगले म्हणाले की, मागील 5 वर्षे के.पी.पाटील हे कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यांनी इतक्या वर्षात कधी साखरेचा दर कमी केला नाही. परंतू पराभवाच्या भितीने ते साखरेचा दर कमी करत आहेत. साखर कारखान्याने एफआरपी पेक्षा जादा दर कधीच दिला नाही. केपी यांनी लै भारी ची टिमकी वाजवली आहे. कोजन चा झालेला नफा तेवढाच कारखान्यात तोटा हे गौड बंगाल सभासदांना कळलेच नाही.सभासदांची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात ढपला पाडण्याचं काम के पी यांनी केले आहे.

यावेळी कोकण केसरी के.जी.नांदेकर, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, बिद्रीचे माजी संचालक दत्तात्रय उगले, सुर्याजीराव देसाई, कल्याणराव निकम, मदनदादा देसाई, बाळासाहेब भोपळे, धैर्यशिल भोसले-सरकार, जयवंतराव चोरगे, दौलतराव जाधव, अशोकराव भांदीगरे, अंकूश चव्हाण यांच्यासह प्रमुख मान्यवर व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.