सिडनी : एखादी गोष्ट सातत्याने करणाऱयाचे कुणालाही फारसे कौतुक नसते. याचा प्रत्यय जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला तिसऱयाच दिवशी आला. यजमान हिंदुस्थानचा विजयरथ रोखून सहाव्यांदा जगज्जेतेपदाच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरणाऱया ऑस्ट्रेलियाच्या स्वागतासाठी विमानतळावर कुणीच आले नव्हते...

त्यांच्या पराक्रमाची मायदेशात साधी दखलही कुणी घेतली नाही. ऑस्ट्रेलियन संघ सिडनीच्या विमानतळावर दाखल होताच काही मोजके मीडियावाले सोडले, तर इतर कोणी त्यांच्याकडे ढूंकूनही बघितले नाही. मात्र जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन संघाचे मायदेशात झालेले थंडे स्वागत पाहून हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींनी त्यांची फिरकी घेण्यातच धन्यता मानली.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचे बुधवारी सकाळी सिडनी विमानतळावर आगमन झाले, मात्र कर्णधाराच्या स्वागतासाठी मोजकेच मीडियावाले उपस्थित होते, सामान्य क्रिकेटप्रेमींचा तिकडे पत्ताच नव्हता. पॅट कमिन्सचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो ऑस्ट्रेलियातील सिडनी विमानतळावर दिसत आहे, मात्र ऑस्ट्रेलियन संघ किंवा त्याच्या कर्णधाराचे स्वागत करण्यासाठी तेथील लोकांमध्ये विशेष उत्साह दिसत नव्हता. पॅट कमिन्सचे स्वागत करण्यासाठी एकच अधिकारी उपस्थित होते. कमिन्सशी हस्तांदोलन करून ते त्याच्यासोबत बाहेर गेले. कमिन्सच्या बॅगादेखील त्याला स्वतःलाच बाहेर घेऊन जावे लागले.