‘ त्या ‘आमदारांना सभासद केलं हीच आमची चूक : के . पी पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी ): 14 हजार लोकांना आम्ही बिद्री कारखान्यात सभासद करून घेतलं.पण यामुळे आमदारांच्या पोटात दुखायला लागलं आणि त्यांच्यामुळे आम्हाला हायकोर्टात धाव घ्यावी लागली. त्या आमदारांना सभासद केलं ही सुद्धा आमची चूकच झाली, अशी अप्रत्यक्ष टीका माजी आमदार के.पी .पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर केली आहे. 3 डिसेंबर रोजी श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या वाघापूर येथे झालेल्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना के .पी पाटील म्हणाले ,विरोधक के.पी .पाटील कारखान्याचे पत्रेही विकणार अशी टीका करत होते पण कारखान्याचा सहवीज प्रकल्प आम्ही पूर्ण केला. कामगारांची सगळी देणी आपण दिली आहेत. काहीही करून कारखान्याला आणि आम्हाला बदनाम करण्याचं काम विरोधक करत आहेत. 60 हजार केएलपीडीची डिस्टलरी आता दोन महिन्यात चालू होणार आहे. जे ऊस उत्पादक कारखान्याला ऊस घालत नाहीत त्यांना 20 रुपये दराने साखर देत होतो आता आमची परत सत्ता आली तर 15 रुपये दराने साखर देऊ ,अशी ग्वाही यावेळी के .पी. पाटील यांनी दिली.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील,माजी आमदार संजय घाटगे, दिनकरराव जाधव ,भैय्यासाहेब माने ,प्रवीण भोसले ,फत्तेसिंह भोसले ,पांडुरंग कांबळे ,सुनील कांबळे, राहुल देसाई आदी उपस्थित होते.