नवीन नोकऱ्यांची वाढ सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर…

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सोमवारी जाहीर केलेल्या नोकरीच्या आकडेवारीनुसार, नवीन नोकऱ्यांच्या वाढीमध्ये सप्टेंबरमध्ये महिन्यात घट झाली आहे.त्यामुळे नवीन नोकऱ्यांची वाढ सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे.

सप्टेंबरमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) च्या नवीन सदस्यांच्या संख्येत घट झाली आहे. नवीन EPF सदस्यांची संख्या ऑगस्टमध्ये 9,53,092 होती आणि सप्टेंबरमध्ये ती 6.45 टक्क्यांनी घसरून 8,91,583 वर आली.

सप्टेंबरमध्ये नवीन ईपीएफ सदस्यांची संख्या 8,91,583 होती. ऑगस्ट (2,48,980) च्या तुलनेत सप्टेंबरमध्ये (2,26,392) महिलांच्या संख्येत घसरण झाली आहे.

नवीन सदस्यांमध्ये 18-28 वर्षे वयोगटातील तरुणांचा वाटा ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये किंचित जास्त होता. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये, तरुणांचा वाटा ऑगस्टमध्ये 67.93 टक्के होता (6,47,522), जो सप्टेंबरमध्ये किंचित वाढून 68.8 टक्के झाला (6,13,471) आहे.

आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये 3.67 लाख सदस्य ईपीएफओमधून बाहेर पडले. मागील महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 12.17 टक्के कमी आहे. जून 2023 पासून EPFO सोडणाऱ्या सदस्यांची संख्या कमी होत आहे. 

या महिन्यात 8.92 लाख नवीन सदस्य सामील झाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. यापैकी सुमारे 2.26 लाख महिला सदस्य आहेत, ज्या पहिल्यांदाच EPFO मध्ये सामील झाल्या आहेत.

‘पेरोल’ची राज्यवार आकडेवारी पाहिल्यास, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि हरियाणामध्ये सर्वाधिक सदस्य जोडले गेले. जोडलेल्या सदस्यांच्या संख्येत त्यांचा वाटा 57.42 टक्के आहे. 

या राज्यांनी 9.88 लाख सदस्य जोडले. आकडेवारीनुसार, साखर उद्योग, कुरिअर सेवा, लोह आणि पोलाद, रुग्णालये, ट्रॅव्हल एजन्सी इत्यादींमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.