कंत्राटी एसटी कर्मचारांचे भीक मांगो आंदोलन…कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एसटी कामगार एकत्र

कोल्हापूर: कंत्राटी एस. टी (S. T) कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर बसून भीक मांगो आंदोलन केले. कामगारांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे. यासाठी आज (दि. १०) कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

कंत्राटी एसटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना भेटून मागणीचे निवेदन दिले. ‘कोरोना आणि एसटी संप काळातील कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे’ अशी मागणी आंदोलकांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

कोरोना आणि एसटी संप काळात ज्या कंत्राटी कामगारांना एसटी प्रशासनाकडून कंत्राटी पद्धतीने भरती करून घेण्यात आले होते त्यांना त्यानंतर सेवेतून कमी करण्यात आले. या काळात काही कामगारांनी स्वतः च्या नोकऱ्या सोडून एसटी महामंडळाच्या नोकरीत दाखल झाले होते.

आता त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली असून, कंत्राटी कर्मचारी म्हणून भरती करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायमचे समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभरातील कंत्राटी एसटी कर्मचाऱ्यांनी आज कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

तसेच त्यांची मागणी मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी एस टी प्रशासनाला दिला आहे. या आंदोलनाला राज्यभरातील कंत्राटी भरती करण्यात आलेले एसटी कर्मचारी सहभागी होते.