खुपीरे येथील बलभीम संस्थेत ९० लाखांचा अपहार माजी अध्यक्षांसह ५४ जणांवर ठपका : सहकारात एकच खळबळ

दोनवडे : खुपीरे (ता. करवीर) येथील बलभीम सेवा संस्थाच्या संचालक मंडळावर भ्रष्टाचार केल्याचे समोर आले असुन सहकार न्यायालयात तात्कालीन अध्यक्ष, संचालक व इतर ५४ व्यक्तींच्या विरोधात वसुलीचे दावे दाखल केले होते. चौकशीत सहायक निबंधक संभाजी पाटील यांनी गूळ अॅडव्हान्स व प्रशासकीय अहवालातील मुद्द्यांवरून ५४ जणांवर ९० लाख ६३ हजार ३०६ रुपये अपहाराबाबत जबाबदारी निश्चित केली आहे. ही रक्कम १२ टक्के व्याजासह जमा करण्याचा आदेश ही देण्यात आला आहे.

बलभीम विकास संस्थेच्या २०१६ ते २०२१ संचालक मंडळाने भ्रष्टाचार केल्याची तक्रार सभासद प्रकाश चौगुले, गौतम पाटील, सरदार बंगे, सागर चौगले यांनी सहकार निबंधकांकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने शासकीय लेखा परीक्षक अनिल पैलवान यांनी लेखापरीक्षण करून अपहार केल्याप्रकरणी दोन वर्षापूर्वी करवीर पोलिस ठाण्यात माजी अध्यक्ष व संचालकावर अपहाराची रक्कम वसुलीचे दावे दाखलही केले.

सहायक निबंधक संभाजी पाटील यांनी कलम ८८ अन्वये चौकशी सुरू केली चौकशीत दाव्यातील गुळ अँडव्हान्स पोटी अडत विभागाच्या धोरणानुसार गुळ अँडव्हान्स देताना गुळ आवक व मूल्यांकनाबाबत खात्री करून अॅडव्हान्स अदा केले नसल्याचे स्पष्ट झाले. संचालकांनी लेखी खुलासे कोणत्याही कागदपत्राशिवाय मांडल्याने सादर केलेले म्हणजे ग्राह्य मानता येत नाही.

त्यामुळे या रकमांची संचालक मंडळावर वैयक्तिकरीत्या जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचा ठपका चौकशीत ठेवण्यात आला आहे.