सरसकट शिष्यवृत्तीसाठी राज्य सरकारकडे आग्रह धरणार : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : सारथीने काढलेल्या जाहिरातीमध्ये आधिछात्रवृतीधारकांच्या संख्येबाबत कोणताही उल्लेख नसल्याने केवळ २०० विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय सरकारला घेता येणार नाही. मराठा समाजाला नसलेले आरक्षण, कोणत्याही शैक्षणिक सवलती आणि मराठा समाजाची संख्या लक्षात घेऊन सारथीच्या पुढील बॅचपासून सरसकट शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय लागू करावा. याबाबत मी सरकारकडे आग्रह धरेन अशी ग्वाही विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सारथीच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयासमोर गेल्या नऊ दिवसांपासून साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा समाजातील पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली.

राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील पीएच.डी करणारे १४०० विद्यार्थी पात्र असताना केवळ २०० संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा आमच्यावर अन्याय असून ही फेलोशिप सरसकट द्यावी या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी ३० ऑक्टोबरपासून साखळी उपोषणाला बसले आहेत.मात्र, सारथीच्या मुख्य कार्यालयातील प्रशासनाने या उपोषणाकडे दुर्लक्ष केले आहे. या पार्श्वभूमीवर आज आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी या विद्यार्थ्यांची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी सारथीच्या माध्यमातून पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांचा कानावर घालणार असून त्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची ग्वाही दिली.

आमदार पाटील यांचा फोन अन मंत्रालयातील यंत्रणेपर्यंत पोहचल्या विद्यार्थ्यांच्या वेदना
आमच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहचत नसल्याची खंत विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत होती. त्यामुळे आमदार पाटील यांनी सारथी विभागीय कार्यालयाच्या सहव्यवस्थापकीय समन्वयक किरण कुलकर्णी यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेतली. तेथूनच त्यांनी नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांच्याशी फोनवरून संवाद साधत या संशोधक विद्यार्थ्यांचा प्रश्न त्यांच्या कानावर घातला. आमदार पाटील यांच्या सूचनेनंतर मंत्रालयातील नियोजन विभागातून या विद्यार्थ्यांच्या समस्येची माहिती कुलकर्णी यांच्याकडून तत्काळ मागविण्यात आली.

🤙 9921334545