कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्हा परिषद च्या आज झालेल्या स्थायी समिती सभेत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.

या सभेत महिला व बालकल्याण विभागाकडील 10% जि.प.स्वनिधी अंदाजपत्रकानुसार सन 2023-24 करीता ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना व्यावसायीक व तांत्रिक प्रशिक्षण देणे (फुड प्रोसेसिंग) यास मान्यता देण्यात आली. तसेच ग्रामपंचायत विभागाकडील निर्लेखन करण्याच्या दोन विषयांना मान्यता देण्यात आली. निर्लेखनाचे प्रस्ताव फोटोसह सादर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कृषी विभागाकडील जि.प.स्वनिधीमधून 50% अनुदानावर इले.मोटर इंजीनसाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) कार्यप्रणालीव्दारे योजना राबविणे व शेतकऱ्यांना बायोगॅस सयंत्रास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य पुरविणेसाठी मान्यता देण्यात आली. जि.प.स्वनिधी हस्तांतर योजना याबाबत जमा-खर्चाचा आढावा घेण्यात आला.
तसेच माहे सप्टेंबर 2023 अखेर कमी खर्च असणारे विभाग समाजकल्याण, कृषी, आरोग्य, दिव्यांग यांना खर्चाचे प्रमाण वाढ करण्यासंदर्भात सूचना दिल्या. त्याचबरोबर सन 2022-23 मधील कामांची मुदत संपत आली असल्याने वेळेत कामे पूर्ण करुन प्राप्त असलेला निधी अखर्चीत राहू नये याची दक्षता संबंधीत अधिकाऱ्यांनी घ्यावी तसेच सन 2019 मधील भरती फी रक्कमे संदर्भात जस-जसे अर्ज प्राप्त होतील, तस-तसे फी रक्कम परत करण्याच्या सूचना या सभेत देण्यात आल्या.
यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) मनीषा देसाई तसेच सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.
