मध्य प्रदेश: ‘न खाऊंगा न खाने दुंगा’, असे बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा मुलगा देवेंद्र प्रताप सिंह तोमर यांचा एक शंभर कोटी रुपयांच्या लाचेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


या व्हिडीओने मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ईडी आणि आयकर विभाग कुठे आहेत? असा सवाल करीत काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. या व्हिडीओत कोटय़वधी रुपयांच्या लाचेच्या देवाण-घेवाणीबद्दल उघड-उघड बोलले जात आहे. त्यामुळे ईडी आणि आयकर विभागाने याची सखोल चौकशी करायला हवी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
मध्य प्रदेशात ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत देवेंद्र प्रताप सिंह तोमर यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते एका खाण व्यावसायिकाकडून कोटय़वधी रुपयांची लाच घेण्यासंबंधी बोलत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्याने भाजपची नाचक्की होत आहे. काँग्रेससह विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाने या व्हिडीओची सत्यता तपासून कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मीडिया समन्वयक पीयूष बबेले यांनी सोशल मीडियावरून केली आहे. या व्हिडीओत देवेंद्र तोमर फोनवर एका मोठय़ा व्यापाऱ्याशी कोटय़वधी रुपयांच्या देवाण-घेवाणीबद्दल बोलत आहेत. ज्यात ही व्यक्ती ट्रान्झॅक्शनसाठी वेगवेगळ्या पाच खात्यांची डिटेल्स मागत आहेत. तसेच यात वेळ विचारत आहे. या व्हायरल व्हिडीओत त्यागी आडनाव असलेल्या आरबीआयमधून निवृत्त कमिश्नरच्या माध्यमातून कोण्या पार्टीला 100 कोटी रुपये देण्याची तयारी असल्याबद्दल बोलले जात आहे. डील फिक्स करणे आणि हरप्रीत गिल आणि गील नावाच्या फर्मच्या संचालकाकडून पैशांची देवाण-घेवाणबद्दल बोलले जात आहे. व्हिडीओतील व्यक्ती देवेंद्र प्रताप तोमरला कधी कवी, गुरुजी, कधी भैया बोलत आहे. तसेच राजस्थान आणि पंजाबच्या एका पार्टीकडून 39 कोटीची डील फिक्स होण्याचेही बोलले जात आहे. ज्यात 18 कोटी आले असून 21 कोटी आणखी देण्याचे बोलले जात आहे. दरम्यान, देवेंद्र प्रताप सिंह तोमर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोटय़वधी रुपयांची डील
या कथित व्हिडीओत केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा मुलगा देवेंद्र तोमर एका खाण व्यापाऱ्याकडून कोटय़वधी रुपयांची लाच घेण्यासंबंधी चर्चा करीत आहे. काँग्रेस नेत्यांनी हा व्हिडीओ शेअर करून भाजपवर हल्ला चढवला आहे. ईडी आणि सीबीआयला टॅग करून आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जरा चौकशी करा, अशा शब्दांत चिमटा काढला आहे.