कुंभी-कासारी’ची प्रतिटन ३२०० ₹ उचल

दोनवडे (प्रतिनिधी) : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याने २०२३-२४ च्या हंगामाकरिता प्रतिटन ३२०० रुपये उच्चांकी उचल देण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी पत्रकार बैठकीत केली. जिल्ह्यात आतापर्यंत अन्य कारखान्यांनी जाहीर झालेल्या पहिल्या उचलित कुंभीची प्रतिटन ३२०० ₹ ही उच्चांकी उचल आहे.

हंगाम २०२३-२४ करता कारखान्याचे ७ लाख मेट्रिक टनाचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यंदाच्या हंगामात कारखान्यास लागण व खोडवा एकूण ११२३७ हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याने पाणीटंचाई होण्याची शक्यता असून ऊस उत्पादनात घट होऊन कमी प्रमाणात ऊस उपलब्ध होईल असा अंदाज आहे.

कारखान्याचे ऊस गळीताचे उद्दिष्ट साध्य करण्याकरता सर्व ऊस उत्पादक शेतकरी बंधू भगिनी, तोडणी वाहतूक यंत्रणा, कामगार यांनी संपूर्ण पिकवलेला ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष नरके यांनी केले आहे.कुंभी कारखान्याने हंगाम २०२२-२३ ची संपूर्ण एफआरपी ऊस उत्पादकांना आदा केली आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सेक्रेटरी प्रशांत पाटील उपस्थित होते. सवलतीची साखरेतून ८० ते १०० रुपये

अध्यक्ष नरके यांनी कारखाना ऊस उत्पादक सभासदांना दरमहा ५ किलो साखर शेअर्स पोटी व ऊस पुरवठाधारकांना प्रतिटन २ किलो टनेजपोटी सवलतीच्या दरात साखर देते,सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या साखरेचा विचार करता इतर कारखान्याच्या तुलनेत प्रति टन ८० ते १०० रुपये जास्त ऊस उत्पादकांना लाभ मिळतो असे ते म्हणाले.