कोल्हापूर: स्वमग्नता अर्थात ऑटीझम हे भाषा, सामाजिक, विचार व त्यानुसारचे वर्तन या विकासा मध्ये येणाऱ्या गुंतागुंतीचे अपंगत्व आहे. हा विषय दुर्लक्षित असून समाजात याबाबत अजूनही म्हणावी तशी जागृती नाही. गेले पाच वर्षापासून अमन फाउंडेशन कोल्हापूर ही संस्था स्वमग्न मुलांच्या विकासासाठी कार्यरत आहे.
स्वमग्न तसेच गतिमंद मुलांच्या भविष्याचा दृष्टिकोन समोर ठेवून फाउंडेशनने नुकतीच “कृती” या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. मुलांच्या सहभागातून पर्यावरण पूर्वक वस्तूंची निर्मिती करण्यात येणार आहे. आपली स्वमग्न मुले स्वावलंबी व्हावीत याकरिता आई पालकांनी घेतलेला पुढाकार हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे.
या दिवाळीसाठी कृती मार्फत अभिनव पद्धतीने बनवण्यात आलेले फ्लूरोसंट आकाश कंदील, पणत्या, हँडमेड तसेच ऑरगॅनिक साबण, सुगंधी चंदन ,मोगरा उटणे आदी वस्तू बनविण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण बंडा पेडणेकर यांनी दिले. काल राजारामपुरी आठवी गल्ली येथे कृती प्रकल्पाचा आरंभ तसेच वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. याचे उद्घाटन सुंदर चित्रे काढणाऱ्या ईशान हलके या स्वमग्न मुलाच्या हस्ते झाले.
ईशान सह आरोही, राजवीर, अमन,प्रज्ञेश ,श्रीयश, जिजा, वेद ही विशेष मुले प्रमूख उपस्थित होती. संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर यांनी मनोगतात अक्षम असणाऱ्या बालकांना सांभाळणाऱ्या विशेषतः आई पालकांची व्यथा व आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यात कृती प्रकल्पाची गरज व्यक्त केली .दीपा शिपुरकर यांनी प्रास्ताविकात कृती प्रकल्पाचे उद्दिष्ट विशद केले.कपिल मुळे यांनी आभार मानले.
संस्थेचे संदीप पाटील, विशेष शिक्षिका अमृता भारती, आरती बाणेदार, दिपाली जाधव,आई पालक प्रिया भोसले,प्रचिती पेंढारकर, गीता हलके, प्रिया खाबडे, सुनिता करंजवडेकर यांनी परिश्रम घेतले. श्रद्धा राजुरीकर, आर्किटेक्ट शिरीष बेरी, पद्मजा तिवले, ज्येष्ठ चित्रकार अनिल उपळेकर, डॉ . उदय संत,डॉ .चंद्रहास कापडी,सुनिल उपळेकर , स्नेहल कुलकर्णी, सीमा पाटील , गौरी पाटील, सुधीर हांजे तसेच अनेक हितचिंतक यांनी यावेळी प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.
