मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्याकडून आमरण उपोषण करण्यात येत आहे. तर, राज्यभरात साखळी उपोषण करण्यात येत आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यात हे आंदोलन आता आणखी तीव्र केले जाणार आहे. उद्यापासून राज्यभरात सुरु असलेले साखळी उपोषणाच्या ठिकाणी आता आमरण उपोषण सुरु करण्याचे आवाहन जरांगे यांनी केले आहे. तसेच, कोणालाही काहीही झाल्यास यासाठी सरकार जबादार राहील असेही जरांगे म्हणाले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.तसंच, आंदोलन अधिक तीव्र केलं आहे. 29 ऑक्टोबरपासून म्हणजेच उद्यापासून गावागावातील हजारो लोकांनी आमरण उपोषणाला बसावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसंच, आंदोलनाचा यापुढचा टप्पा 31 ऑक्टोबरला स्पष्ट करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्याची मागणी केली. सोबतच मराठा समाजाच्या लोकांना शांततेनं आंदोलन करण्याचं आवाहन केलं.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलनादरम्यान जर कोणालाही काहीही झालं. तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारची राहणार आहे. जरांगे पुढे म्हणाले, साखळी उपोषण सुरू आहे. त्याठिकाणी आता आमरण उपोषण सुरू करा. आजूबाजूच्या सगळ्या गावांनी या उपोषणात सहभागी व्हा. त्यांच्या या आवाहनानंतर आता सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.