आयसीआयसीआय बँकेकडून महानगरपालिकेस इलेक्ट्रिक 5 टिप्पर

कोल्हापूर (प्रतिनिधी) आयसीआयसीआय बँक व आयसीआयसीआय फाउंडेशनकडून कचरा उठावसाठी महापालिकेला पाच इलेक्ट्रिक टिप्पर वाहने आज देण्यात आली. त्याचे उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील व प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले.

आयसीआयसीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक झोनल मॅनेजर पवन माळवी व रिजनल मॅनेजर प्रकाश मेश्राम यांनी प्रशासकांकडे किल्ल्या सोपविल्या. महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात कार्यक्रम झाला.

या वेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उपायुक्त साधना पाटील, सहायक आयुक्त संजय सरनाईक, डॉ. विजय पाटील उपस्थित होते. या गाड्यांची ५५० किलो कचरा वाहून नेण्याची क्षमता आहे. प्रत्येकी सहा लाखप्रमाणे ३० लाखांच्या या गाड्या आहेत. चार तासांत चार्ज होऊन १२० किलोमीटर धावते.

ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी दोन कप्पे देण्यात आले आहेत. आमदार पाटील यांनी या गाडीची संकल्पना आयसीआयसीआय बँकेकडे व्यक्त केली. त्याला अनुसरून या गाड्या दिल्या. यासाठीचा प्रस्ताव व आवशक्य गोष्टींचा पाठपुरावा बँकेच्या शासकीय बँकींग सुविधेचे कोल्हापूर जिल्हा समन्वय अधिकारी अर्जुन काळे यांनी केला. त्याला रिजनल मॅनेजर विकास देशमुख यांचे सहकार्य लाभले.
या वेळी अर्जुन काळे, लक्ष्मीकांत स्वामी, दीपक पाटील, मयूर येवला, निलोफर आजरेकर, संजय मोहिते, शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, मधुकर रामाणे, अर्जुन माने, पूजा नाईकनवरे, उमा बनछोडे, शोभा कवाळे उपस्थित होते.