“टायगर इज बॅक” ; जागोजागी निलेश राणेंच्या स्वागताचे बॅनर

सिंधुदुर्ग: नाराजी नाट्यानंतर आज प्रथमच माजी खासदार नीलेश राणे सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जिल्ह्यात त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी महामार्गावर ठिकठिकाणी “टायगर इज बॅक” अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. सध्या हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

“मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे.” अशा आशयाचं ट्विट नीलेश राणे यांनी केलं होतं. दसऱ्याच्या मुहूर्तावर केलेल्या ट्विटमुळे भाजपसह राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. भाजपच्या पक्षांतर्गत निर्माण झालेल्या गटबाजीबद्दल जिल्ह्यात चर्चा होत होती.

काही वर्षांपासून नीलेश राणे हे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. तशी त्यांनी मतदारसंघात जोरदार तयारी देखील सुरू केली होती. या ट्वीटनंतर सिंधुदुर्गातून नीलेश राणे यांचे काही कार्यकर्ते त्यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. त्यातच कुडाळ नगरपंचायतीमधील दोन नगरसेवक अभिषेक गावडे आणि प्राजक्ता शिवलकर यांनी राजीनामेही दिले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मोठे पुत्र नीलेश राणे यांनी अचानकपणे जाहीर केलेल्या राजकीय निवृत्तीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नीलेश राणे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अवघ्या २४ तासांतच नाराजी दूर झाली.