कोडोली : साखर कारखान्यांनी जर उपपदार्थातील हिस्सा शेतक-यांना देणार नसेल तर इथेनॅाल निर्मीतीला आमचा विरोध असून कारखान्यांनी साखरचेच उत्पादन घ्यावे असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ४०० रूपयाच्या दुस-या हप्त्यासाठी काढण्यात आलेली आक्रोश पदयात्रेचा आठवा मुक्काम कोडोली येथे होता. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की राज्यातील साखर कारखाने इथेनॅालसह वीज निर्मीती व उपपदार्थ निर्मीती मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. यामधून साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळविले आहे. मात्र कारखानदार त्या उत्पन्नातील राहिलेल्या नफ्याचे पैसे ऊस उत्पादक शेतक-यांना देण्यास तयार नाहीत. रंगराजन समितीच्या शिफारशीतील कारण पुढे करून उपपदार्थातील वाटा शेतक-यांना देण्यास टाळाटाळ करत आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बॅकेस स्वाभिमानीच्यावतीने मंत्री हसन मुश्रीफ यांच्या म्हणण्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील ब-यापैकी साखर कारखान्यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून वित्तपुरवठा करण्यात आला आहे. या साखर कारखान्याकडून एप्रिल २०२३ पासून ॲाक्टोंबर २०२३ पर्यंत शिल्लक असलेली साखर किती दराने विक्री केली व किती विक्री केली व आज अखेर साखरेचा साठा किती शिल्लक आहे याबाबतची प्रत्येक महिन्याची सविस्तर विवरण पत्र देण्याची मागणी करण्यात आली आहे.
जर साखर कारखानदार वाढीव हिस्यातील पैसे शेतक-यांना देण्यास तयार नसतील तर शेतक-यांची रिकव्हरी कमी दाखवून कमी केलेल्या रिकव्हरीतील एफ. आर. पी पेक्षा जादा होणारी रक्कम जर देणार नसतील कत्यांनी उपपदार्थ उत्पादन बंद करून साखरेचे उत्पादन घ्यावे. यावेळी वारणा सहकारी साखर कारखान्यावर निवेदन देवून ४०० रूपयाचा दुसरा हप्ता दिल्याशिवाय कारखाना सुरू करण्यात येवू नये या मागणीचे निवेदन संचालक मंडळास देण्यात आले.