आक्रोश ‘ पदयात्रेचा साखर कारखानदारांनी घेतला धसका ; विनाकपात 3100 रुपये दर देण्याची घोषणा

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘आक्रोश ‘ पदयात्रेत उसाच्या कांडाला हात लावू देणार नाही, असा इशारा दिल्यानंतर झालेली कोंडी फोडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आणि विशेष करून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील चार साखर कारखान्यांकडून विनाकपात 3100 रुपये दर देण्याची घोषणा केली आहे.

गेल्यावर्षीच्या ऊस हंगामातील चारशे रुपये दिल्याशिवाय चालू हंगामात ऊसाच्या कांडाला हात लावू देणार नाही असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आक्रोश पदयात्रेचा कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी चांगला धसका घेतल्याचे दिसत आहे.

या कारखान्यांनी दिला विना कपात दर :

ज्या चार कारखान्यांनी विनाकपात 3100 रुपये दर देण्याची घोषणा केली आहे त्यामध्ये गुरुदत्त, जवाहर, दत्त आणि शरद साखर कारखान्यांचा समावेश आहे. या चार साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचे पत्र सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. दरम्यान, साखर हंगाम समाप्तीनंतर रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युलानुसार निघणारा अंतिम दर साखर आयुक्तांच्या मान्यतेनं देणार असल्याचे यामध्ये म्हटले आहे. नेमक्या याच मुद्द्यांव शेट्टी यांनी साखर कारखानदारांना धारेवर धरलं आहे.