जालना : गुणरत्न सदावर्ते यांचे अनेक मालक आहेत. त्यांचं दिल्लीत खूप चालतं म्हणे. मग या लोकांना मराठा समाजाला आरक्षण मिळवून का देता आलं नाही? गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी श्रद्धेय असणाऱ्या नेत्यांनी मराठा समाजाचा केवळ वापर करुन घेतला, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईतील घराबाहेर त्यांच्या अलिशान गाडीच्या काचा गुरुवारी सकाळी फोडण्यात आल्या.
त्यानंतर संतापलेल्या गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका करत, ‘हेच का तुमचं शांततापूर्ण आंदोलन?’, असा सवाल विचारला होता. तसेच मनोज जरांगे पाटील यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले.
मनोज जरांगे यांनी सदावर्ते यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. नेमकं काय झालं आहे, त्याबद्दल मला काहीच माहित नाही. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. जर सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला झाला असेल, तर त्याचे आम्ही समर्थन करत नाही. तसेच, सदावर्ते यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. या हल्ल्यासाठी ते कोणाचे देखील नाव घेतील. उद्या ते देवेंद्र फडणवीस यांचे नाव देखील घेतील, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.