नाशिक : विशेष पोलिस महानिरीक्षकाच्या गडकरी चौकातील कार्यालयात पुन्हा एकदा चोरीचा प्रकार समोर आला आहे. अगोदरच चंदन चोरी आता स्टीलची साखळीची चोरी झाली. पण, पोलिसांनी अवघ्या काही तासात चोरट्यास गजाआड केले..याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश विजय गंधे (४० रा.फिरस्ता) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. नाशिक परिक्षेत्राच्या कार्यालय परिसरात ही घटना घडली होती. सोमवारी (दि.२३) कार्यालयाच्या कंपाऊडला बसविलेल्या सुमारे तीन हजार रूपये किमतीचे स्टीलच्या अंदाजे तीन ते साडे तीन फुट लांबीच्या साखळया भामट्याने चोरून नेल्या होत्या. ही बाब निदर्शनास येताच पोलिस शिपाई यश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी अल्पावधीत संशयितास शोधले असून अधिक तपास पोलिस नाईक मगर करीत आहेत. दरम्यान चंदन तस्करांचे वाढते आव्हान लक्षात घेवून काही दिवसांपूर्वीच या कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले. चोवीस तास कडेकोट बंदोबस्त असतांनाही संरक्षण भिंतीही वाढविण्यात आल्या. मात्र तरीही या परिसरात चोरीचे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.