बारामती : जर अजित पवार माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमस्थळी आले तर अजित पवारांना कारखान्यात जावू दिले जाणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे .मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन दिवसेंदिवस राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला येण्यास मराठा क्रांती मोर्चाने विरोध केला आहे. अजित पवारांना बोलावू नका, त्यांनी येऊ नये आशा आशयाचे पत्र माळेगाव पोलिसांना आणि साखर कारखान्याला मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि , मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारला दिलेला वेळ संपल्याने जरांगे यांनी उपोषणाची भूमिका ठाम ठेवली आहे. आजपासून मी उपोषणाला बसतोय. सरकार आमच्या वेदना समजेल अशी आशा होती, पण सरकार दिशाभूल करतंय.
सरकारला दिलेला ४० दिवसांचा अल्टिमेट संपला असून ४१दिवस उजाडला तरी, सरकार आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.अन्न-पाणी घेणार नाही, औषधं घेणार नाही. गावात कुणी आलं तर त्यांना शांततेत माघारी पाठवा, असं आवाहन जरांगे यांनी गावकऱ्यांना केलं आहे.
उग्र आंदोलन करू नका, आंदोलन शांततेनं करा, आत्महत्या करू नका, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा संघटना आक्रमक झाली असून या संघटनेने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना माळेगाव सहकारी कारखान्यात येऊ देणार नाही असा इशारा दिला आहे .येत्या 28 ऑक्टोबरला अजित पवारांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मोळी पूजन होणार आहे.