करवीर कामगार संघाची प्रांत कार्यालयासमोर निदर्शने

इचलकरंजी : प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. यंत्रमाग धंद्यातील कामगारांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, यासह समान कामाला समान वेतन याप्रमाणे यंत्रमाग मागवाला पुरुषाप्रमाणे महिलांना सुद्धा पगार मिळावा,यासह विविध मागण्यांसाठी करवीर कामगार संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की,केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना जाहीर करून सन २०२२पर्यंत देशातील एकही कुटुंब बेघर राहणार नाही, असे जाहीर केले होते. शहरातील कामगार, जनतेने सर्व कागदपत्रांचे परिपूर्ण अर्ज भरून फाईल करून दिली आहे. पण गेल्या सहा वर्षापासून संघटनेच्या माध्यमातून आंदोलने, मोर्चे, निदर्शनेद्वारे घरासाठी संघर्ष चालूच आहे. इचलकरंजी महानगरपालिकेने शहापूर येथील गट नंबर ४६८ मध्ये घर बांधण्यासाठी ठराव करून जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे पाठवला. परंतू, महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा केलेला नाही.पंतप्रधान मोदी सरकार फक्त घोषणा करते त्याची अंमलबजावणी करीत नाही. येथील आजी-माजी आमदारांनी व आजी-माजी खासदारांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे.

यावेळी समीर दानवाडे, हनुमंत लोहार, प्रमोद सपाटे,महेश लोहार, मंगल तावरे,इस्माईल कमालशा, दादू मगदूम,वर्षा जाधव आदी सहभागी झाले होते.