कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजकारणात एकमेकांचे पारंपारिक वैरी म्हणून ओळखले जाणारे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांनी आज (२१ ऑक्टोबर) एकाचवेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या बाजूला बसून कोल्हापुरी फेटा बांधून घेतला. कृषी विभागाच्या प्रशिक्षण केंद्राच उद्घाटन आज करण्यात आल. यावेळी बऱ्याच कालावधीनंतर दोन्ही नेते कृषी विभागाच्या कार्यक्रमात एकत्र दिसले.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले , मी ज्या ज्या ठिकाणी असेन तिथं हे दोघे एकत्र असतील. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी बंटी आणि मुन्ना यांचं सहकार्य मी घेणार आहे.
मुश्रीफ यांनी यावेळी निवडणुकी विषयी भूमिका स्पष्ट केली.शरद पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांना माझ्या शुभेच्छा असल्याचे ते म्हणाले. महायुतीच्या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करेन, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला. दुसरीकडे, चार दिवसांपूर्वीच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. असे असतानाच आता शरद पवार गटाकडूनही दावा करण्यात आला आहे.
कोल्हापूरमधून जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लोकसभानिहाय आढावा बैठकीत शरद पवारांकडे एकमुखाने मागणी पदाधिकऱ्यांकडून करण्यात आली. तर हातकणंगलेमधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांना उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे. यावेळी बैठकीत कोल्हापुरातील दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आली असून मविआच्या जागावाटपातही हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडेच घेण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी केली.