सोलापूर : खूप अन्याय झालाय, अन्यायाची जाणीव राहू द्या, आरक्षणासाठी आपल्या मराठा बांधवानी बलिदान दिले, हे बलिदान विसरता येणार नाही. मराठा बांधवांच्या बायकांच्या कपाळावरचे कुंकू पुसलं, याची आपल्याला आठवण ठेवायला लागणार आहे. त्यामुळे हा पहिला आणि शेवटचा लढा समजून एवढ्या ताकदीनं उभं राहा की आरक्षण पदरात पडलंच पाहिजे, असं कळकळीच आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
मनोज जरांगे पाटील हे आज सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या दौऱ्यावर असून आज या ठिकाणी मराठा बांधवांची भव्य सभा होत होत आहे. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवाना सूचक सल्ला दिला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आत्तापर्यंत 55 पेक्षा जास्त बांधवांनी बलिदान दिले आहे,”आपल्या समाजासाठी अनेकांनी बलिदान दिले, हे बलिदान विसरता येणार नाही. अण्णासाहेब पाटलांपासून, अण्णासाहेब जावळे पाटलांपर्यंत, वडजे पाटलांपासून, विनायक मेटे साहेबांपर्यंत बलिदान दिले ते आपल्याला विसरून चालणार नाही. आता पुढच्या काळात अन्याय होऊ द्यायचा नाही, हा लढा शेवटचा आणि पहिला समजून इतक्या ताकदीने लढायचा की मराठ्यांच्या पदरात आरक्षण पडलंच पाहिजे.”