हुपरी (प्रतिनिधी):- उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये प्रतिटन या व राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे डिझीटल केल्याशिवाय यंदा गाळपास परवानगी देऊ नये, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संस्थापक राजू शेट्टी दि. १७ ऑक्टोबर पासून शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यापासून आक्रोश पदयात्रेस सुरूवात करून आज दुस-या दिवशी ही पदयात्रा रांगोळी याठिकाणी पोहचली.
सकाळी ८ वाजता हेरवाड येथून दुस-या दिवशीच्या पदयात्रेस प्रारंभ होत अब्दुललाट शिरदवाड रांगोळी , हुपरी जवाहर साखर कारखाना , यळगूड व कसबा सांगाव ५३ किलोमीटर अंतर पार करून या मार्गावर ही पदयात्रा पोहचली.
सायंकाळी ५ वाजता ही पदयात्रा जवाहर साखर कारखान्यावर पोहचली दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणा देत कारखाना परिसर दणाणून सोडला.राजू शेट्टी यांनी कारखान्यावर सभा घेऊन कारखान्याचा हिशोब सांगून कशा पध्दतीने ४०० रूपये देता येतात सांगून कधीही कारखान्यावर हिशोबास येण्यास तयार असल्याचे आवाहन दिले. त्याचपध्दतीने काटामारीचे प्रमाणही वाढल्याने सर्व काटे डिजिटल करून ॲानलाईन केल्याशिवाय हंगाम चालू होवू देणार नसल्याचे सांगितले.
दि. १७ ऑक्टोबर पासून पदयात्रा सुरू होऊन गुरूदत्त, जवाहर, घोरपडे, शाहू, वारणा, क्रांती, वसंतदादा, राजारामबापू आदी ३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ किमी पदयात्रा चालत जाऊन ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत ही पदयात्रा सामील होणार आहे. दरम्यान प्रत्येक ठिकाणी घरटी भाकरी गोळा करून तेथील शेतकऱ्यांनी जेवणाची सोय केली आहे.
प्रत्येक गावात पदयात्रेचे जल्लोषी स्वागत केले जात आहे. जोपर्यंत ४०० रूपयांचा हप्ता दिला जात नाही. तोपर्यंत एकाही साखर कारखान्याची ऊस तोड सुरू होणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. पदयात्रेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सामील व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.