कळे-मरळी दरम्यान ठाकरे गटाच्या वतीने महामार्गावर रास्ता रोको

कोल्हापूर : कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर पहिल्या टप्प्यात कळे-कोल्हापूर दरम्यानच्या रस्त्याचे काम निकृष्ट व धिम्या गतीने सुरु आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातामध्ये वाढ झाली आहे.याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदार कंपनीने तातडीने कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाच्या वतीने महामार्गावर कळे-मरळी दरम्यान आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते सकाळी अकराच्या सुमारास कळे – मरळी दरम्यान जमले. याठिकाणी उपअभियंता आर. बी. शिंदे व प्रकल्प व्यवस्थापक विवेकानंद देशमुख यांना मागण्यांचे निवेदन दिले.

येथील खराब रस्त्यांमुळे वाहनचालकांसह विद्यार्थी व गर्भवती महिलांना नाहक त्रास होत आहे. या रस्त्यासाठी लागणाऱ्या मुरुमाची वाहतूक कळे बाजार पेठेतील मुख्य रस्त्यावरून होत असल्याने वाहतुकीची वारंवार कोंडी होत आहे. धुळीमुळे नागरिक व व्यापाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी घोषणाबाजी करून प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

या आंदोलनामुळे कोल्हापूर- गगनबावडा मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. घटनास्थळी कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश पोवार, पन्हाळा तालुकाप्रमुख कृष्णात कदम, गगनबावडा तालुकाप्रमुख सतीश पानारी, शेतकरी सेना जिल्हा संघटक रणधीर पाटील, उपतालुकाप्रमुख प्रशांत पोवार आदीसह परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते.