मुंबई: महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिलं पाहिजे. कुणबी आणि मराठा एकच आहेत याचे पाच हजार पुरावे सापडले आहेत. आता सरकारला काय ट्रकभर पुरावे हवेत का? एक पुरावा मिळाला तरी खूप झाला. एका आडनावचे लोक एका गावात असतील तर त्यात नातं असतंच. मग परत प्रत्येकाला वेगळा पुरावा मागणार का? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे.
आमचं युद्ध शांततेचं आहे ते रोखणं सोपं नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आम्हाला कुणबीतून आरक्षण हवं आहे ते आम्हाला हवं आहे. गोरगरीब मराठ्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. आरक्षण आम्ही मिळवणारच असा निर्धारच जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आता जर आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही तर मात्र जे आंदोलन होईल ते सरकारला झेपणार नाही असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठा आरक्षण दिलं गेलं नाही तर आम्ही २२ तारखेला पुढची दिशा ठरणार. आम्ही कुणाच्या लांगुलचालनासाठी नाही तर आमच्या बांधवांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन सुरु केलं होतं. आता सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आंदोलन होणार. पण आता जे आंदोलन होईल ते सरकारला झेपणार नाही असा इशाराच आता मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आम्ही एकाच मुद्द्यावर आंदोलन करतो आहे की आम्ही निकषात बसतो का नाही? आमच्या अर्ध्या भावांना व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं आहे कारण त्यांचा व्यवसाय शेती आहे. मग आमच्याकडे काय समुद्र आहे का? असा उपरोधिक सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे आणि व्यवसायाच्या आधारे आम्हालाही कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. आता जे आंदोलन आम्ही करु ते पहिलं आणि शेवटचं असेल.