कोल्हापूर (प्रतिनिधी) : कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे झालेल्या टेम्पो आणि कार अपघातामध्ये कोल्हापूरचे तिघेजण ठार झाले आहेत. पुणे-बेंगळुरु महामार्गावर पाचवड फाटा येथे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघातात मृतामध्ये जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील हवालदार नितीन पोवार यांचा समावेश आहे.
या अपघातामध्ये भाऊ, बहिण व भाचा असे तिघेजण ठार झाले आहेत. या अपघातासंबंधी कराड तालुका पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, नितीन बापूसाहेब पोवार (वय ३५ वर्षे, रा. उचगाव), त्यांची बहिण मनिषा आप्पासाहेब जाधव (वय ५४ वर्षे, रा.जरळी, गडहिंग्लज )व भाचा अभिषेक जाधव (वय २४ वर्षे,) हे कारने साताऱ्याकडे निघाले होते. कराड जवळील पाचवड फाटा येथे भाग्यलक्ष्मी हॉटेलजवळ महामार्गावर बाजूला आयशर ट्रक उभा होता. त्यांच्या कारने पाठीमागून ट्रकला जोरदार धडक दिली. नितीन पोवार हे कार चालवित होते.
अपघाताची माहिती समजताच कराड तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी, महामार्ग पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले. संबंधितांना हॉस्पिटलमध्ये हलविले. दरम्यान या भीषण अपघातामध्ये जखमी झालेल्या कारमधील तिघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे. या अपघातामध्ये कारचेही मोठे नुकसान झाले आहे.