कोथळी : (दिगंबर संघवर्धन) – ब्रह्माकुमारीज् विश्वविद्यालय मेडीकल विंग्ज तसेच सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय यांचे संयुक्त विद्यमाने “नशा मुक्त भारत” अभियान संपुर्ण देशात राबविले जात आहे. त्यानुसार कोल्हापुर व राधानगरी टीमच्या वतीने न्यु इंग्लिश स्कुल मानबेट पैकी चौके या शाळेत समुपदेशन करणेत आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस एम खडके होते.
युवा पिढीमध्ये विभिन्न प्रकारच्या व्यसनांची अधीनता वाढत चालली आहे. यामध्ये तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट, ड्रग्ज, दारू इ. पदार्थांच्या बरोबरच मोबाईल सारख्या साधनांचाही समावेश आहे. या व्यसनांच्या परिणामस्वरुप लोकांना समाजामध्ये कायदेबाबत, सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
भारतात दररोज १४ ते १८ वयोगटातील ५५०० मुले व्यसनाधिन होत आहेत, तर दरवर्षी १३.५ लाख लोकांचा मृत्यू तंबाखूच्या व्यसनामुळे होत आहे. परंतु व्यसनांची अधीनता कितीही दीर्घकालीन असली तरीही आशेचा किरण आहे उचित मार्गदर्शन, समुपदेशन, औषधे, सात्विक आहार आणि योगेश्वर परमात्म्याने गीतेमध्ये शिकवलेल्या राजयोगाच्या विवेकपूर्ण प्रयोगाने व्यक्ती कोणत्याही अधीनतेला सोडू शकतो. असे आयोजकांतर्फे संचालिका प्रतिभा दिदी व आरती दिदींनी सांगितले.
ब्रह्माकुमारीजमध्ये राजयोगी जीवनशैली शिकवली जाते, ज्याद्वारे आपण आपल्या विचारांना सकारात्मक दिशा देऊ शकतो. परिणामस्वरूप, इच्छाशक्ती, स्वाभिमान, अतिंद्रिय सुख, सहनशक्ती, मानसिक शांती वाढते, जी व्यसनांच्या दुष्ट चक्रातुन मुक्त होण्यास मदत करते. असे कृष्णात भाई, संजय भाई, रमेश भाई, प्रकाश भाई यांनी सांगितले. यावेळी सर्व शिक्षक, कर्मचारी, विध्यार्थी – विध्यार्थीनी उपस्थित होते. सुत्रसंचलन एन एन पाटील तर आभार मुख्याध्यापक एस एम खडके यांनी मानले.