शिरोळ ( नामदेव निर्मळे) : टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील जिल्हा परिषद शाळा कुमार विद्यामंदिर येथे माजी सैनिक सूर्यकांत बदामे यांचेकडून 40 खुर्च्या व 3 एल.सी.डी टीव्ही शाळेमध्ये प्रदान करण्यात आले.
एकीकडे शिक्षक संख्या कमी असल्यामुळे पालक आपल्या मुलांना खाजगी शाळेचा रस्ता दाखवत आहेत. तर दुसरीकडे खुद्द महाराष्ट्र शासन २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करून गोर -गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत. मात्र टाकळीवाडीचे ग्रामस्थ आपली हक्काची जि. प. शाळेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी झटत आहेत. टाकळीवाडी ता.-शिरोळ या गावात१ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग आहेत.
सध्या या शाळेत 257 विध्यार्थी शिकत आहेत. शिक्षक भरती नसल्याने येथे आधीच ४ शिक्षक कमी होते. त्यात २ शिक्षक प्रमोशन व एक शिक्षक बदलीने गेल्यामुळे पालक वर्ग हताश झाला. पण गावातील माजी विद्यार्थी यांनी आपल्या शाळेचा अभिमान जागृत ठेवतपुढाकार घेत लोकवर्गणी मोठया प्रमाणात जमा करत क्रिडांगण दुरुस्ती व शैक्षणिक साहित्य मोठया प्रमाणावर मिळवून दिले. अजूनही मदतीचा ओघ वाढतच आहे. हे माजी विध्यार्थी एवढयावरच न थांबता पालक भेट घेऊन आम्ही ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत आपली मुले शिकली पाहिजेत असा जागर निर्माण करत आहेत. हा आदर्श खरोखर इतर गावाकऱ्यांनी घेण्यासारखा आहे.
सूर्यकांत बदामे साहेबांचा सत्कार करण्यात आला . बऱ्याच गावकऱ्यांनी मदतीचा ओघ सुरू ठेवलेला आहे. यावेळी सैनिक असोसिएशन ,ग्रामपंचायत सर्व सदस्य, समस्त नागरिक, पालक, मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक ,शिक्षिका, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.