.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात नोकरी करणाऱ्या महिला व युवतींच्या सुरक्षित निवासासाठी महानगर पालिकेने केंद्र सरकारच्या ‘सखी निवास योजने’ तर्गत शहरात वसतीगृहे उभारावीत अशी मागणी आमदार ऋतुराज संजय पाटील व आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.
महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात आ. पाटील व आ. जाधव यांनी म्हटले आहे, महाराणी ताराराणींचे शहर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. या शहराने महिलांच्या कर्तृत्वाचा नेहमीच सन्मान राखला असून सर्वच क्षेत्रामध्ये महिलांना पाठबळ दिले आहे. कोल्हापूर शहर व परिसर हे उद्योग-व्यवसायांचे मोठे केंद्र असल्याने जिल्ह्यातील विविध गावातून आणि जिल्ह्याबाहेरूनही अनेक महिला व युवती नोकरीनिमित्त शहरात येतात.
नोकरी करणाऱ्या महिला आणि युवतींचे प्रमाण मोठे असून बऱ्याचदा त्यांना शहरामध्ये राहण्यासाठी अडचणी निर्माण होतात. नोकरी निमित्त शहरात येणाऱ्या महिलांच्या सुरक्षित वास्तव्याची सुविधा निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. अशा नोकरदार महिलांसाठी केंद्र सरकारने ‘सखी निवास योजना’ सुरु केली आहे.
नोकरदार महिलांसाठी महानगरपालिकेने शहरात किमान तीन ते चार ठिकाणी जागा उपलब्ध करून देऊन ‘सखी निवास योजने’ अंतर्गत महिलांसाठी वसतिगृहे सुरु करावीत अशी मागणी होत आहे. तरी याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी या पत्राद्वारे आ. पाटील व आ. जाधव यानी केली आहे.
