कोल्हापूर( प्रतिनिधी) : ओबीसी समाजाच्या जातीनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेल मार्फत अखंड महाराष्ट्रभर जन आंदोलन छेडण्यात येणार असून त्याची सुरुवात ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यभूमीतून करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी केले.
आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर असणाऱ्या राजापूरकर यांनी शाहू समाधी स्मारकास भेट देली. यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर म्हणाले की, देशात बहुजन समाजाच्या आरक्षणाची सुरुवात सर्वप्रथम कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी केल्याने खऱ्या अर्थाने शाहू महाराज हे बहुजनांच्या आरक्षणाचे जनक आहेत. राज्यात ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे यासाठी राष्ट्रवादीच्या ओबीसी सेल मार्फत अखंड महाराष्ट्रभर जन आंदोलन छेडण्यात येणार असुन त्याची सुरूवात शाहूंच्या पवित्र भुमितून करण्यात येणार आहे. यासाठी कोल्हापूरच्या राजकारणातील अनेक चढउतार पाहणारे राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते व जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांचे मार्गदर्शन आम्हाला महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले..
यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही बी.पाटील यांनी ओबीसीच्या अखिल महाराष्ट्र जन आंदोलनास जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहिर पाठिंबा असुन जिल्ह्यातील सर्व बहुजन समाजाची ताकद या आंदोलनाच्या पाठीमागे उभे करून आपणास सर्वतोपरीस सहकार्य करू अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी संजयकुमार कोळी,अध्यक्ष ओबीसी विभाग पश्चिम महाराष्ट्र, शहाजी ढोणभिसे, अध्यक्ष सांगली ओबीसी सेल,आशिफ खलिफे, राज्यसमन्वयक ओबीसी सेल व गणी आजरेकर आदी उपस्थित होते.