आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताची देदीप्यमान कामगिरी ; एकूण 107 पदकांची कमाई

हांग चौऊ: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताने प्रथमच देदीप्यमान यश मिळविले असून तब्बल १०७ पदकांची कमाई करताना तिसरे स्थान प्राप्त केले आहे.

या १०७ पदकांमध्ये २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ ब्राँझपदकांचा समावेश आहे.यंदा कोणत्याही परिस्थितीत शंभरीपार जायचेच असा निर्धार भारतीय खेळाडूंनी केला होता. खेळाडूंच्या या अभूतपूर्व यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याप्रमाणेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी खेळाडूंचे स्वागत केले आहे.

स्वतः पंतप्रधान मोदी हे पदकविजेत्या खेळाडूंसोबत संवाद करणार असल्याचे समजते. या स्पर्धेच्या आजच्या अखेरच्या दिवशी सहा सुवर्ण, चार रौप्य आणि दोन ब्राँझपदकांची कमाई केली. तिरंदाजी, महिला पुरुष कबड्डी, क्रिकेट बॅडमिंटन दुहेरी अशा सुवर्णपदकांनी आजचा दिवस गाजला. यजमान चीनने सर्वाधिक ३७९ पदके मिळवून आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला. जपान आणि कोरिया अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले.