कोल्हापूर: मिशन रोजगार अंतर्गत कोल्हापूर दक्षिण जॉब फेअरचे ५ आणि ६ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजन केले असून यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शंभरहून अधिक नामांकीत कंपन्या सहभागी होणार आहेत. साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील कॅम्पस् येथे ही जॉब फेअर होणार आहे.
कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील युवा पिढी तसेच नोकरी इच्छूक असणा-या सर्वांसाठी ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. इच्छुकांनी www.missionrojgar.com या वेबसाईटवर नोंदणी करावी, असे आवाहन आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केले आहे. 7230999550 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास ऑनलाईन नोंदणीची लिंक एसएमएस द्वारे पाठवली जाईल, असे आ.पाटील यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन रोजगार या उपक्रमाद्वारे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील युवा पिढीला नोकरीच्या संधी सातत्याने उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक कंपन्यांना आवश्यक असे योग्य मनुष्यबळ मिशन रोजगारच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले आहे. तसेच कोल्हापूर इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून स्टार्ट अप ना प्रोत्साहन दिले आहे. यातील काही जणांनी छोट्या-मोठ्या कंपन्यासुध्दा सुरु केल्या आहेत.
मिशन रोजगार अधिक व्यापक करत असताना युवा पिढीबरोबर गृहिणींनाही कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योग व्यवसाय तसेच नोकरीच्या संधी मिळवून दिल्या आहेत. या प्रशिक्षणामुळे अनेक युवक युवती तसेच गृहिणींनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. आता या पुढे जाऊन कोल्हापूर दक्षिण जॉब फेअरच्या माध्यमातून अधिक मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
यामध्ये स्कील्ड, अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड अशा सर्व इच्छूकांना या जॉब फेअरसाठी नोंदणी करता येणार आहे. आयटी, उत्पादन, हेल्थ केअर, हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोटीव्ह, फार्मा, हाऊसकिपींग या व अन्य क्षेत्रातील नामांकीत कंपन्यांचे प्रतिनिधी साळोखेनगर कॅम्पस् येथे मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पाडणार आहेत.
यासाठी इच्छूकांना मिशन रोजगारच्या वेबसाईटवर जाऊन आवश्यक ती माहिती भरुन पूर्वनोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केलेल्या इच्छूकांसाठी पूर्व तयारी म्हणून मुलाखतीचे तंत्र, आवश्यक कौशल्ये, बायोडाटा याबद्दल ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ज्ञान आशा फौंडेशन ही संस्था या जॉब फेअरसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणा-या द डेटा टेक लॅब्ज या कंपनीचे सीईओ डॉ. अमित आंद्रे यांनी सांगितले की, नोकरी इच्छूक आणि नोकरी देणा-या कंपन्या यांच्यामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही योग्य त्या समन्वयातून या जॉब फेअरच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यरत आहोत.
मिशन रोजगारच्या माध्यमातून होत असलेल्या या जॉब फेअरसाठी योगदान देण्याचे समाधान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्या कंपन्याना या जॉब फेअर मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी www.kolhapurjobfair.com या वेबसाईटवर आपली माहिती नोंदवावी. तसेच जॉब फेअरबाबत अधिक माहितीसाठी मिशन रोजगारच्या 9356928686 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.