कपिल शर्मासह या चार कलाकारांना ईडीने बजावला समन्स

नवी दिल्ली : एक मोठी बातमी समोर येत आहे. महादेव बुक अॅप प्रकरणी हास्य कलाकार कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि हिना खान हिला ईडीने समन्स बजावलं आहे.याआधी अभिनेता रणबीर कपूरला देखील ईडीने समन्स बजावलं आहे.महादेव अॅप हे ऑनलाइन बेटिंग अॅप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात ईडीने महादेव अॅपची चौकशी सुरू केली होती. ईडीने त्यावेळी कोलकाता, भोपाळ, मुंबईसह देशातील विविध शहरांमध्ये छापे टाकून सुमारे 417 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. तसेच याप्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली होती.सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल महादेव हे ऑनलाइन बेटिंग अॅपचे मालक आहेत. सौरभ चंद्राकरने यावर्षी यूएईमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले.

सौरभने लग्नात जवळपास 200 कोटी रुपये खर्च केल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर कपूरसह इतर अनेक स्टार्सनीही या लग्नाला हजेरी लावली होती. (त्यांनी या लग्नाला केवळ हजेरी लावली नाही तर परफॉर्मही केला. इतकेच नाही तर त्यांनी सौरभच्या ऑनलाइन बेटिंग अॅपची जाहिरातही केली. या सगळ्यासाठी त्यांना रोख रक्कम देण्यात आली. याच कारणामुळे ईडीने या सेलिब्रिटींना समन्स बजावले आहे.

याप्रकरणी ईडी त्यांची चौकशी करणार आहे.दरम्यान, ईडीने रणबीर कपूरला उद्या म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी रायपूर येथील ईडी कार्यालयात हजार राहण्यासाठी समन्स पाठवले होते. मात्र, रणबीर कपूरने ईडीकडे ईमेलद्वारे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. याप्रकरणात तो आरोपी नसून त्याची फक्त पैशांच्या व्यवहाराशी संबंधित चौकशी केली जाऊ शकते.