मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते अजित पवार बंड करत भाजप-शिवसेना गटात जावून उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. त्याचवेळी अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप होत आहेत.
वास्तविक भाजपनेच अजित पवार यांच्यावर अशा स्वरुपाचे आरोप केले होते. मात्र आता सत्तेत सामील झाल्यानंतर नितेश राणे यांनीच अजित पवार यांच्याबाबत उद्धव ठाकरे गटाला अजब सवाल केला आहे. नितेश राणे म्हणाले की, दादा महाविकास आघाडीत असताना तुम्ही दादांच्या मांडीला मांडी लावून बसायचे. तेव्हा अजित दादांचा ७० हजार कोटींचा घोटाळा दिसला नाही का? असा सवाल नितेश राणे यांनी केला.
जे शिवसेनेचे आमदार आमच्याबरोबर सत्तेत आहेत, त्यांच्यावर जे आरोप आहेत, ते आरोप महाविकास आघाडीच्या काळात पण होते. सत्तेत असताना तुम्हाला त्यांचे घोटाळे दिसले नाहीत का? असंही राणे यांनी विचारलं. दरम्यान उठसूट आमच्यावर आरोप कऱण्यापेक्षा स्वत:च्या बुडाखाली किती आग लागली आहे ते तुम्ही पाहा. संजय ऱाऊतांना मी आव्हान करतो की, तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर माझ्यासोबत व्यासपीठावर या…जागा, वेळ आणि तारीख तुम्हीच ठरवा, असही नितेश राणे म्हणाले.