स्वाभिमानी संघटनेचा ‘ ढोल बजाओ ‘ आंदोलन करत इशारा…

कोल्हापूर : गेल्यावर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन 400 रूपये तातडीने द्या, अन्यथा गाठ स्वाभिमानीशी आहे, असा इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ढोल बजाओ आंदोलन करत दिला.कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज (2 ऑक्टोबर) प्रत्येक कारखान्याच्या दारात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. गुरूदत्त, जवाहर, पंचगंगा व शरद साखर कारखान्यावर ढोल बजाओ आंदोलन करून 400 रूपये तातडीने देण्याची मागणी करण्यात आली.

ऊस निर्यातबंदी केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्य सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडले होते. आता गेल्यावर्षीच्या तुटलेल्या ऊसाच्या हिशेबावरून स्वाभिमानीने साखर कारखान्यांना धारेवर धरले आहे. त्यामुळे गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.तातडीने दुसरा हप्ता 400 रूपये खात्यावर जमा कराकोल्हापुरात शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यावर ढोल बजावो आंदोलन करून जागर करण्यात आला.

सावकर मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजावो आंदोलन करण्यात आले. सावकर मादनाईक म्हणाले की, गेल्या वर्षभरात साखरेला व उपपदार्थास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर मिळाले आहेत. साखर कारखान्यांना यामधून चांगल्या पध्दतीने नफा मिळालेला आहे. वाढलेल्या महागाईमुळे औषधे, खते, बी बियाणे, किटकनाशके यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वाढलेल्या या महागाईमुळे शेतकयांचे कंबरडे मोडले आहेत.

तोंडावर दसरा आणि दिवाळी आल्याने ऊस उत्पादक शेतकर्यांच्याकडे सणासुदीला पैसे नाहीत. यामुळे कारखान्याकडून तातडीने दुसरा हप्ता 400 रूपये खात्यावर जमा करण्यात यावे.साखर वाहतूक अडवून उग्र स्वरूपाचे आंदोलनसदरचा हप्ता जमा न केल्याने ढोल ताशा आंदोलन करून आज आपणास जागे करण्यात येत आहे. उद्यापासून कारखान्यातून बाहेर पडणारी साखर वाहतूक अडवून उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. तसेच दसऱ्याच्या अगोदर आमच्या हक्काचे 400 रूपये प्रतिटन न दिल्यास तुमची दिवाळी गोड होणार नाही, असा इशारा सावकर मादनाईक यांनी दिला.

यावेळी विठ्ठल मोरे, वैभव कांबळे, सागर संभूशेटे, शैलेश आडके, सचिन शिंदे, बंडू पाटील, भिमगौंडा पाटील, सागर मादनाईक, वासू भोजणे, विश्वास बालिघाटे आदी उपस्थित होते. दसऱ्यापूर्वी हक्काचे 400 रूपये प्रतिटन न दिल्यास दिवाळी गोड होणार नाही, असा इशाराच ‘स्वाभिमानी’ने साखर कारखानदारांना इशारा दिला आहे.