मुंबई : कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार नियुक्त करण्याबाबत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून टीका झाल्यानंतर ही जाहिरात रद्द करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.
जळगाव जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नियुक्त करण्याबाबत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरण्याचे शासनाचे धोरण नाही. राष्ट्रीय प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी अनुभवी निवृत्त अधिकाऱ्यांना मदतीला घेतले जाते. मात्र त्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरले जाणार असा गैरसमज झाल्याचे स्पष्टीकरण जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
तत्काळ ती जाहिरात रद्द करा, अशा स्पष्ट सूचना जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना देऊन याबाबत सविस्तर खुलासा मागविल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. कंत्राटी तहसीलदार पदभरतीची जाहिरात ही कोणाच्या डोक्यातून आलेली सुपीक कल्पना होती, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.