उत्तर प्रदेश : तापाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय मुलीवर चुकीचे उपचार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. मैनपुरीच्या घिरोर पोलीस ठाण्यातील करहल रोडवर असलेल्या राधा स्वामी हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. यामुळे मुलीची प्रकृती खालावू लागली. तिला दोन दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालय व्यवस्थापनाने गंभीर अवस्थेत असलेल्या मुलीला रूग्णालयातून बाहेर काढलं.
मुलीचं कुटुंबीय तिला बाईकवर बसवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलीला योग्य उपचार मिळेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम केलं. आरोपी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी फरार आहेत. रुग्णालय सील करण्यात आले आहे.येथे १८ वर्षीय भारती अकरावीत शिकत असून तिला ताप आल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, भारतीवर डॉक्टरांनी चुकीचे उपचार केले. दोन दिवस रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलीची प्रकृती ढासळू लागली. यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. येथील कर्मचाऱ्यांनी मुलीला रुग्णालयातून बाहेर काढलं.समोर आलेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये भारती बेशुद्ध असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. एका तरुणाने भारतीला पकडून ठेवलं आहे. मात्र त्यानंतर वेळेवर उपचार न मिळाल्याने भारतीचा मृत्यू झाला.
मुलीच्या मृत्यूनंतर रुग्णालयातील कर्मचारी मृतदेह सोडून पळून गेल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे, तर भारतीवर उपचार करणारे डॉक्टर रवी यादव यांनीही घटनास्थळावरून पळ काढला. प्रकरण वाढल्यावर आरोग्य विभागाचे पथक, पोलीस आणि एसीएमओ घटनास्थळी पोहोचले. भारतीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असल्याचा दावा करणारा रवी यादव कोणतीही पदवी किंवा डिप्लोमा न घेता रुग्णांवर उपचार करत असल्याचं समोर आलं आहे. अशी अनेक हॉस्पिटल्स मैनपुरीमध्ये सुरू असून, त्यांची नोंदणी दुसऱ्याकडे असून रुग्णालय दुसऱ्याच व्यक्तीकडून चालवले जात असल्याचे समोर आले आहे. मैनपुरी जिल्ह्य़ात या डॉक्टरांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. .