एकमेकांचे कट्टर विरोधक सतेज पाटील व महादेवराव महाडिक पुन्हा आमने-सामने…

कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज कारखान्याच्या कार्यस्थळावर सकाळी 11 वाजता होत आहे.या सभेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जय्यत तयार करण्यात आली आहे. सतेज पाटील आणि महादेवराव महाडिके गट आमने-सामने येणार असल्यामुळे या सभेमध्ये देखील गोंधळ होण्याची शक्यता आहे.आजच्या सभेत सर्वात मोठा मुद्दा असणार आहे तो कारखान्याच्या पोटनियमांमध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव.

कारखाना कार्यक्षेत्रामध्ये आणखी 44 गावांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोधी सतेज पाटील गटाकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील 14 गावांचा समावेश आहे. या निर्णयावर सतेज पाटील यांनी महाडिक साखर कारखाना वैयक्तिक मालकीचा करत असल्याचा आरोप केला आहे.

कार्यक्षेत्रात गावे वाढवण्यासह निवडणूक लढवण्याचे निकष, उमेदवारांची पात्रता यासंदर्भातील नियमांमध्येही बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे वार्षिक सभेत वादावादीची शक्यता आहे.दुसरीकडे, गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी सभेचा दिवस सत्ताधाऱ्यांनी निवडल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. सभा सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे, त्याला सुद्धा आक्षेप घेण्यात आला आहे.

सभा एक वाजता घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, विरोधकांच्या मागणीकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष करत कोणताही बदल केलेला नाही. दरम्यान, राजाराम कारखान्यावर महाडिक गटाची एकहाती सत्ता असल्याने सर्वच विषय एकाच टप्प्यात मंजूर केले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विरोधक समांतर सभा सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढतील अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी सभासदांचे सर्व प्रश्न जाणून घेतले असून त्यांना उत्तरे पाठवली आहेत. सर्व प्रश्नांची आम्ही उत्तरे देऊ, असेही म्हटले आहे.दुसरीकडे, सत्ताधारी महाडिक गटाला याच महिन्यात मोठा धक्का बसला असून राजाराम कारखान्यातील 1272 सभासद अपात्रठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये शौमिका महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबातील 10 जणांचा समावेश आहे.

News Marathi Content