डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इलेक्ट्रोकेमिकल सुपरकपॅसिटरला पेटंट ;

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकानी ऊर्जा साठवण्यासाठी बनवलेल्या “इलेकट्रोकेमिकल सुपरकपॅसिटर डिव्हाइस’ला पेटंट जाहीर झाले आहे.विद्यापीठाला मिळालेले हे २६ वे पेटंट आहे.

विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागाचे डीन व रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली १५ ते २० वर्षापासून ऊर्जा साठवणुकीच्या पद्धतीवर संशोधक टीम सातत्याने काम करत आहेत.

संशोधकानी तयार केलेल्या नावीन्यपूर्ण ऊर्जा साठवणुक डिव्हाइसला २१ ऑगस्ट २०२३ रोजी पेटंट मंजूर झाले आहे. २० वर्षासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरूपात संरक्षित केले जाईल.

मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, तयार केलेले सुपरकपॅसिटर डिव्हाइस ऊर्जा साठवण्याकरता अत्यंत उपयुक्त आहे. भारतातील युवा संशोधकांनी उच्च दर्जाचे ऊर्जा साठवणूकी करता साधने तयार करण्यासाठी संशोधावर भर द्यावा. भारतीय इलेक्ट्रॉनिक व टेलीकम्युनिकेशन बाजारपेठेमध्ये हे संशोधक नक्कीच आमूलाग्र बदल घडवून आणतील.

या संशोधनामध्ये मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे व यांच्यासमवेत संशोधक विद्यार्थी डॉ. प्रिती बागवडे, डॉ. धनाजी माळवेकर, संभाजी खोत आणि रणजित निकम यांचा सहभाग होता.

पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.