वॉशिंग्टन : खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर अमेरिकी गुप्तचर संस्थांनीच त्याबद्दलचे पुरावे कॅनडाला दिले होते,परंतु कॅनडाने आपल्या गुप्तचरांच्या माहितीच्या आधारे भारतावर कट रचल्याचा आरोप केला, असा दावा संबंधित अमेरिकी अधिकाऱ्यांनी केल्याचे वृत्त 'न्यूयॉर्क टाइम्स'ने दिले आहे.
अमेरिकी गुप्तचर संस्थांनी दिलेल्या निज्जरच्या हत्येच्या संदर्भामुळेच भारताच्या सहभागाचा निष्कर्ष काढण्यास कॅनडाला मदत झाली. तरीही जे उजेडात आले ते संशयास्पद असून कटात भारताचा कथित सहभाग दर्शवणारे कॅनडातील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांचे संभाषण कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी जमवले होते, असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तथापि, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी कॅनडाच्या तपासात सहकार्य करण्याचे आवाहन भारताला केले आहे, तर अमेरिकी अधिकाऱ्यांनी भारताकडून अमेरिकेला कोणताही राजनैतिक प्रकारचा धक्का बसू नये यासाठी प्रयत्न केले.
परंतु, अमेरिका आपला जवळचा भागीदार म्हणून भारताकडे आशेने पाहात असताना अमेरिकी गुप्तचरांनी कॅनडाला पुरावे दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कॅनडा आणि भारत यांच्यातील राजनैतिक पातळीवरच्या लढाईचा फटका अमेरिकेला बसू नये यासाठी तो देश कमालीची दक्षता घेत असल्याचे सांगण्यात येते.
निज्जरची हत्या होईपर्यंत या कटाबद्दलची माहिती किंवा त्यातील भारताचा सहभाग दर्शविणारे पुरावे अमेरिकेला मिळाले नव्हते, असेही संबधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. निज्जरला धोका असल्याचा इशारा कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी दिला होता. त्याच्या मित्रांनी आणि साथिदारांनीही त्याला येणाऱ्या धमक्यांबद्दल वारंवार सांगितल्याचे समजते.