सांगरूळ (वार्ताहर ) : येथील गणेशोत्सव मंडळाचे स्टेजसिनचे सजीव देखावे पाहण्यासाठी सांगरूळ सह परिसरातील रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.चालू वर्षी गणेशोत्सव मंडळांनी ऐतिहासिक व चालू घडामोडीवर आधारित देखाव्यावर अधिक भर दिला होता .कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राजकीय सामाजिक शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी गावात उपस्थिती लावली . स्टेज सिनचे कार्यक्रम नियोजनबद्ध व शांततेत व संयमाने सादर करण्यात आलेत .
सांगरूळ (ता. करवीर) येथे गणेश उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो .चालू वर्षी गावातील २३ गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. यामध्ये आठ गणेशोत्सव मंडळांनी स्टेजसीन सादर केले .इतर मंडळांनी रोडसिन तसेच महाप्रसादाचे नियोजन केले होते .
अजिंक्य क्रीडा मंडळ माळवाडी भाग सांगरूळ यांनी पावनखिंडीतील रणसंग्राम हा ऐतिहासिक देखाव्यातून बाजीप्रभू व जीवा महाले यांचे बलिदान आणि मराठ्यांची असणारी स्वराज्यावरील निष्ठा यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला . विषयांवर स्टेज मांडणी व अभिनय याचा सुंदर मिलाप साधण्याचा प्रयत्न कलाकारांनी केला होता . श्री दत्त गणेश कला क्रीडा मंडळाने मैत्री या देखाव्याच्या माध्यमातून कौटुंबिक व जोत्याजी केसरकर यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा सादर करून आदर्श मित्रत्वाचा संदेश दिला .
श्री राजर्षी शाहू नाळे तालीम मंडळाने सरसेनापती रमाबाई यांचा ऐतिहासिक दाखला देत एक मराठा लाख मराठा हा चालू घडामोडीवर आधारित देखावा सादर करत मराठा आरक्षणावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला .
राधाकृष्ण कला क्रीडा व संस्कृतीक मंडळाने इन्साफ कौन करेंगा हा मणिपूर घटनेवर आधारित सजीव देखावा सादर करताना समाजातील अनिष्ट कृत्यांविरोधात प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला .
न्यू क्रांती तरुण मंडळाने सेलिब्रिटी या सजीव देखाव्यातून मुलांच्या वाढत्या अपेक्षांमुळे आई-वडिलांना होणारा त्रास यातून मुलांची प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला . यावेळी अपंग कलाकारांनी केलेल्या अभिनयाला प्रेक्षकांनी दाद दिली . अष्टविनायक कॉर्नर ग्रुपने पावनखिंड हा ऐतिहासिक देखावा सादर करत बाजीप्रभू आणि मावळ्यांच्या पराक्रमावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला .
गोल्डन जुबिली मित्र मंडळाने कर्मदंड या देखाव्यातून सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला . न्यू यंग स्टार गणेश मंडळांने कशासाठी मिळवलं स्वातंत्र्य या देखाव्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यापासून सद्यस्थितीत फ्लॅशबॅक घेण्याचा प्रयत्न केला . आसरा गणेश मंडळ व अण्णाभाऊ साठे तरुण मंडळांनी भाविकांसाठी महाप्रसादाच्या रूपाने भोजन व्यवस्था केली होती .
ध्वनिफीत स्वतः लिखित व दिग्दर्शित सांगरूळ येथील गणेश उत्सव मंडळातील कार्यकर्ते स्टेजसिन व रोडसिन कार्यक्रमाची ध्वनीफीतीचे स्वतः लेखन करून स्टुडिओमध्ये योग्य त्या आवाजासाठी कलाकारांचा वापर करून ध्वनिफीत तयार केली जाते . अधिक करून तयार कॅसेटचा वापर टाळला जातो.
संपूर्ण कार्यक्रमांमध्ये सर्वच मंडळे एकमेकाला सहकार्याची भूमिका घेत कार्यक्रम शांततेने पार पडतात .हे येथील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. आपला कार्यक्रम उठावदार व्हावा यासाठी गेली महिनाभर मंडळांचे कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्नशील होते .